परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करून अतिवृष्टीग्रस्तांना लवकर नुकसान भरपाई दिली जाईल असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. येथील राजगोपालचारी उद्यान येथे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वीरपत्नी व त्यांचे कुटूंबिय, विद्यार्थी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. पालकमंत्री यावेळी म्हणाल्या की, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. या लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राम्हणी, माळसोन्ना यासह अनेक गावा-गावातून मुक्ती संग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असली तरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने मदत केली जाईल असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. दिनांक १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा” राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्यामध्ये विविध शासकीय विभागांमार्फत लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून जनतेने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी रुपये १० लाख अशा जिल्ह्यातील नऊ मृत व्यक्तींच्या वारसांना एकूण ९० लाख रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या वारसांना शासकीय किंवा निम शासकीय विभागात नोकरी देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दोन हजार २३ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये १४ कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे अशी माहितीही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.