परभणी : येथील महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास ४०८ कोटी आणि पाणीपुरवठा योजनेसाठी १५७ कोटी अशा दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यावरून आता महायुतीतील तीनही सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयासाठी कुरघोडीचा खेळ सुरू झाला आहे. आम्ही पाठपुरावा केल्यानेच ही मान्यता मिळाली हे सांगण्यासाठी आता तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.
नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केल्यानंतर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी लगोलग पत्रकार बैठक घेतली. राष्ट्रवादीनेही या संदर्भात हे आमच्याच पाठपुराव्याचे यश असल्याचे म्हटले आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीतही सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये ही श्रेयाची लढाई जुंपलेली पाहायला मिळेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी या दोन्ही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार पाटील यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरल्याचे समाजमाध्यमांवर सांगणे सुरू केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारार्थ गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले. त्यांनी आपल्या भाषणात शहर विकासाच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले. याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्र्यांनी सहा दिवसातच दिलेला शब्द पाळला असे आनंद भरोसे यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणी दौऱ्यावर आले असताना त्यांनी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत संबंधित योजनांचे प्रस्ताव चर्चेला ठेवण्यात आले होते. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री पवार यांनी आश्वासन दिले होते असा दाखला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिला जात आहे.
विकसित परभणीच्या दृष्टिकोनातून मल नि: सारण प्रकल्प महत्त्वाचा असून ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र शासनाकडून १३६ कोटी तर राज्य शासनाकडून १५९ कोटी रुपये दिले जाणार आहेत उर्वरित १२२ कोटी रुपयांचा आर्थिक भार महानगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्था वाट्यामधून द्यावा लागणार आहे. नवीन मंजूर प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी, मुख्य गटार लाईन्सचे जाळे, उपनलिका अशी कामे केली जाणार आहेत.
शहरासाठी घोषित करण्यात आलेली भूमिगत गटार योजना मार्गी लागत नाही म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यापूर्वी जाहिररीत्या सरकारवर टीका केली होती. परभणीला विकासाच्या बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आमदार पाटील यांनी विधिमंडळाच्या सभागृहात या विषयावर आवाज उठवला होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांच्या सभागृहातील भाषणाच्या व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर प्रसृत सुरू केले आहे. प्रत्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या योजनांना सुरुवात कधी होणार हे अनिश्चित असले तरी आत्ताच सत्ताधारी पक्षांनी त्यावरून श्रेयवादाचा खेळ सुरू झाला आहे.
