परभणी : एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून नवजात अर्भक फेकल्याचे निदर्शनास येताच प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना ही बाब कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने पाठलाग केला. ही घटना पाथरी-सेलू राष्ट्रीय महामार्गावर देवनांद्रा शिवारात मंगळवारी (दि.१५) उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकासह दोघाजणांना ताब्यात घेऊन सोडून दिले होते. मात्र, आता या दोघांविरोधात आज गुरुवारी (दि.१७) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, एक १९ वर्षीय तरुणी व २१ वर्षीय तरुण प्रेमसंबंधातून एकत्र राहत होते. ते पुणे येथे कामाला होते. दरम्यान पुण्याहून परभणीला खासगी ट्रॅव्हल्सने येत असताना पाथरी-सेलू दरम्यान देवनांद्रा शिवारात तरुणीने नवजात पुरूष जातीचे अर्भक चालत्या ट्रॅव्हल्समधून बाहेर फेकले. शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीने हे पाहताच ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश लांडगे, पोलीस हवालदार विष्णू वाघ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले. ट्रॅव्हल्सचा शोध घेतला असता गाडी सेलू मार्गे परभणीच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच ट्रॅव्हल्सचा शोध लावला. जुन्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर ही बस थांबवण्यात आली. प्राथमिक चौकशी केली असता प्रवासादरम्यान तरुणी प्रसूत झाली मात्र अर्भक मृत असल्याने ते ट्रॅव्हल्सच्या खिडकीमधून बाहेर फेकल्याचे तरुणाने सांगितले.

तरुणीला पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रॅव्हल्स बस ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी हवालदार अमोल जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून तरुण-तरुणीविरुद्ध अर्भकाचे पालन, पोषण न करण्याच्या उद्देशाने चालत्या बसमधून फेकून देऊन त्या अर्भकाची गुप्त विल्हेवाट लावली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घडलेली घटना अमानुष असून नाममात्र गुन्हा दाखल करून आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. प्रसूतीनंतर अर्भक मृत असल्याने ते फेकून दिले असे जरी तरुणीने सांगितले असले तरी ते अर्भक आधीच मृत होते की बसमधून फेकून दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला याबाबतची संदिग्धता कायम होती. प्राथमिक वैद्यकीय अहवालात डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा पाथरी पोलीस ठाण्यात नोंदवला असून यातील पुरुष आरोपीला अटक करण्यात आली आहे तर महिला आरोपी जिल्हा सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहे.