Parbhani Crime News : परभणीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका शाळेत तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या पालकाने प्रवेशावेळी भरलेली रक्कम आणि फीचे पैसे उरलेले पैसे परत मागितले म्हणून शाळेच्या संस्थाचालकाने पालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पालकाने जीव गमावला आहे. या पालकाला त्याच्या मुलीसाठी दुसऱ्या शाळेत घ्यायचा होता. परभणीमधील पूर्णा तालुक्यातील हट्टा या गावात ही संतापजनक घटना घडली आहे. जगन्नाथ हेंडगे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
जगन्नाथ हेंडगे यांची मुलगी इयत्ता तिसरीत शिकते. तिचं ट्रान्सफर सर्टिफिकेट (हस्तांतरण प्रमाणपत्र) काढण्यासाठी हेंडगे शाळेत गेले होते. शाळेच्या शुल्कातील काही रक्कम थकीत होती. त्याचा राग संस्थाचालक प्रभाकर चव्हाण याच्या मनात होता. हेंडगे यांनी प्रवेशावेळी भरलेली रक्कम परत मागितली आणि त्यातून हेंडगे व चव्हाण या दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर चव्हाण याने हेंडगे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत हेंडगे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रभाकर चव्हाण व त्याच्या पत्नीविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शाळेत नेमकं काय घडलं?
दरम्यान, जगन्नाथ हेंडगे यांच्याबरोबर शाळेत गेलेले त्यांचे नातेवाईक म्हणाले, “मला शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेरच उभं करण्यात आलं होतं. मला आत जाऊ दिलं नाही. मी बाहेरच उभा राहिलो. त्यानंतर दहा मिनिटांनी आतून मोठमोठ्याने आवाज येऊ लागला. तेवढ्यात जगन्नाथ बाहेर आले. त्यांच्या मागे मागे ते (प्रभाकर चव्हाण) सरही आले. त्यांनी जगन्नाथ यांना मागून लाथ मारली आणि जमिनीवर पाडलं आणि आणखी मारलं. ते सर मला म्हणाले, तुम्ही याच्यासोबत आहात का? याला घेऊन जा. त्यांनी मलाही धक्काबुक्की केली. त्यानंतर ते व त्यांची पत्नी एका पांढऱ्या रंगाच्या कारने शाळेतून बाहेर पडले आणि निघून गेले.
या घटनेबाबत यशोदा हेंडगे म्हणाल्या, “क्षुल्लक कारणावरून त्यांनी शाळेच्या केबिनमध्ये मारहाण केली. अशी शाळाच बंद करायला हवी.”