Parth Pawar vs Harshwardhan Sapkal : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील १,८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आयटी पार्क उभारण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ४० एकरांचा भूखंड कुठलंही शासकीय शुल्क न भरता खरेदी केल्याचा आरोप केला गेला. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आता त्यांच्या कंपनीने आणखी एक जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला आहे की पार्थ पवारांच्या कंपनीने पुण्यात डेअरी विभागाची ३५ हेक्टरची जमीन अशाच पद्धतीने लाटली आहे. याप्रकरणी देखील कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच अलीकडच्या काळात जे जे जमीन घोटाळे झाले आहेत त्याप्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करावी.
दुग्धविकास विभागाची जमीन लाटली?
सपकाळ यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “अलीकडेच पार्थ पवार यांचा डेअरीच्या जमिनीशी संबंधित गैरव्यवहार पुढे आला आहे. ३५ हेक्टर पेक्षा जास्त जमीन ही विकली गेली आहे. आयटी पार्कच्या नावाखाली जमिनीचा गैरव्यवहार होत असताना पार्थ पवार यांच्या नावावर असणारी कंपनी अजून एक शासकीय जमीन घेते आणि त्या कंपनीला दौंडमधील साखर कारखान्याकडून पतपुरवठा होतो. दौंडमधील साखर कारखान्यासह इतर काही ठिकाणांवरून निधी मिळवला जातो आणि मग ही ३५ हेक्टर जमीन खरेदी केली जाते. या प्रकरणाशी संबंधित धागेदोरे तपासावेत, सर्व व्यवहार तपासावे आणि योग्य कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.”
पार्थ पवारांच्या कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी
“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ परंतु, या घोषणेच्या अगदी उलट कारभार चालू आहे. सर्व व्यवहारांची, डेअरीच्या जमिनीशी संबंधित घोटाळ्याची देखील चौकशी करून योग्य कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.”
कोरेगाव पार्कमधील जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी चौकशी समिती स्थापन
कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून विरोधकांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असं सांगितले होतं. यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
