अलिबाग- अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात आहे. वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे प्रवाश्यांचा तासंतास खोळंबा होत असल्याने ही मागणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र भूसंपादनासाठी लागणारा खर्च महामार्गाच्या कामापेक्षा अधिक असल्याने, आणि अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प याच परिसरातून प्रस्तावित असल्याने नंतर हा प्रस्ताव बारगळला गेला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत केला गेला. मात्र रस्ता हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झाली नसल्याचे सांगत, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या देखभाल दरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. आता दोन विभागांच्या वादात रस्त्याची मात्र दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय आणि मुंबई जवळचे सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ असलेल्या अलिबागला येणाऱ्या रस्त्यावर दर शनिवार रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळत आहे. ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे.
सुट्टीच्या दिवशी अलिबाग आणि मुरुड तालुक्यात साधारणपण पंचवीस हजारहून अधिक पर्यटक येत असतात. त्यामुळे या वडखळ अलिबाग आणि अलिबाग मुरुड मार्गांवरील वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. अरुंद रस्त्यांमुळे दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते, याचा फटका स्थानिकांसह पर्यटकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पेझारी ते शाहबाज, कार्लेखिंड घाट परिसर, वाडगाव ते अलिबाग या दरम्यान सुट्टीच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे या महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करा अशी मागणी केली जात आहे.
अलिबाग ते वडखळ मार्गावर वाहनांची प्रचंड वाढली आहे. सध्या अस्तित्वात असलेला मार्ग हा अरुंद आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी २५ मिनटांचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण व्हायलाच हवे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करावेत. सतिश धारप, जिल्हा संघटक भाजप
पूर्वी २५ ते ३० मिनटात हे अंतर पार करता यायचे, पण आता कीमान एक ते दीड तास लागतो आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक वाढली असल्याने रस्ता रुंदीकरण अपरीहार्य आहे. या संदर्भात मी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा केला आहे. महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग यांना अनेक स्मरणपत्रही दिली आहेत. पण शासनस्तरावर त्याची दखल घेत नाहीत. – अजय उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते