कराड : श्रद्धा अन् सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या मारूल हवेली (ता. पाटण) येथील नंदादीप उत्सवाचे यावर्षी ९० वे वर्ष असून, अखंड श्रावण मास हा उत्सव साजरा केला जातो. या अनोख्या उत्सवात सुमारे सव्वादोन हजार समई दिवसरात्र तेवत असून, नंदादीपाच्या लख्ख प्रकाशाने अवघे मंदिर उजळून निघाले आहे.
सिद्धेश्वर मंदिरात नंदादीप उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ईश्वरावरील श्रद्धा आणि भक्तीच्या भावनेतून १९३६ साली श्रावण महिन्यात या उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. केवळ पाच समई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रज्वलित करून हा उत्सव सुरू झाला. त्यानंतर पुढे दरवर्षी या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. शेजारील विभागासह राज्यभरातील सुमारे दोनशेहून अधिक गावांतील भाविक या उत्सवात आपली समई तेवत ठेवत सहभागी होतात. सहभागी सर्व समई मंदिराचा गाभारा व त्यासमोरील सभागृहात दिवसरात्र संपूर्ण श्रावण महिनाभर अखंडित प्रज्वलित ठेवल्या जातात.
ईश्वरावर असणारी श्रद्धा व भक्तीच्या मार्गातून सुरू झालेला हा उत्सव सामाजिक सलोखा जपणारा उत्सव ठरत आहे. त्यामुळे हा उत्सव दिवसेंदिवस मोठ्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. दरम्यान, नंदादीप उत्सव कमिटीकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच या स्थळाला माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला असून, त्याच्या माध्यमातून मंदिर व मंदिर परिसराचा विकास केला जात आहे. सनबीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सारंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने या उत्सवाची ९० दशकांची परंपरा नेटकेपणाने सुरू आहे. दीपोत्सव पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.