कराड: समाजसेवी व धर्मादाय संस्था या समाजाच्या गरजेसाठी असतात. पण, करोनाच्या संकटकाळात मदतीसाठी काढलेल्या संस्था व न्यासांनी लोकांची लूट केली. आज रुग्णांचे हक्क व अधिकारांवर दररोज दरोडे पडत असल्याचा आरोप करताना, सर्वसामान्य रुग्णांना आपल्या हक्काची सनद माहिती असावी अशी अपेक्षा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
माजी खासदार (कै.) प्रेमलाताई चव्हाण विश्वस्त न्यास व संकल्प सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‘रुग्णालयाचे देयक माफ कसे करावे’ तसेच ‘रुग्णांचे हक्क व अधिकार’ या विषयांवरील व्याख्यानात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रेमलाताई चव्हाण विश्वस्त न्यासाच्या सचिव गौरी चव्हाण, मंगल चव्हाण आदी उपस्थित होते.उमेश चव्हाण म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात आरोग्याचा विषय जागृतीसाठी असणे महत्त्वाचेच. वैद्यकीय मदत कशी मिळवावी, हे अभ्यासक्रमात नसल्याची खंत वाटते. एखाद्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजार रुपये असेल, तर त्याला विश्वस्त न्यासाच्या रुग्णालयात पूर्ण देयक माफ होते. हेच उत्पन्न तीन लाख साठ हजारांचे रुपये असेल, तर निम्मे देयक माफ होते.
डॉक्टर हे रुग्णालयाशी बांधीलपद असून, धर्मादाय रुग्णालय अथवा विश्वस्त न्यासाचे संचालक हेच महत्त्वाचे असतात. हे दवाखाने गोरगरिबांसाठी मोफत असल्याची माहिती नसल्याने आपण अज्ञानपणाने त्या रुग्णालयाच्या पिळवणुकीला बळी पडतो. याकरिता रुग्णांच्या हक्काची असणारी सनद आपल्याला माहिती असावी असे उमेश चव्हाण यांनी सांगितले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकांमध्ये आरोग्याविषयी कुतूहल जागृत व्हावे. रुग्णांना दिलेले हक्क, अधिकार समजले पाहिजेत. नक्की व्यवस्थेत दोष आहेत. केंद्र व राज्य सरकारचे आरोग्य, शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. देशाच्या एकूण उत्पन्नापैकी साडेचार टक्के तरतूद झाल्यास मोफत वैद्यकीय उपचार होतील. यासाठी आग्रह धरला पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेप्रमाणे भारतातही सर्व उपचार मोफत व्हावेत, विकसित राष्ट्र निर्माण करताना उपचार मोफत व्हायलाच हवेत आणि त्यासाठी तरतूद झाली पाहिजे, अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.