निवडणुकीदरम्यान केलेल्या विकास कामावर मतदान मिळते यावरून माझा विश्वासच उडाला आहे. कारण नाशिक शहरातील केलेल्या विकासकामाचा तेथील जनतेला विसर पडला होता, त्यामुळे त्यांनी मतदान करताना माझ्या पक्षाचा विचार केला नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासावर मतदान करणार नसाल तर सगळे भावनांसोबतच खेळणार असंही ते यावेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद शहराच्या अवस्थेला जनता स्वत: जवाबदार असून त्यांनी निवडून दिलेले राजकीय नेते केवळ जातीचे राजकारण करून भिती दाखवूनच मत मिळवतात, आणि तुम्ही त्याला बळी पडतात असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेना-भाजपा-एमआयएम सगळ्यांचं आतमधून लाटसोटं असल्याची टीका करताना छोट्या मोठ्या दंगली घडवतात आणि तुम्हाला घाबरवतात असंही म्हटलं आहे.

औरंगबाद शहराला अंजिठा, वेरूळ अशा जागतिक स्तराची पर्यटन स्थळे लाभली आहेत. शिवाय एकेकाळी औरंगाबाद शहर आशिया खंडातील सर्वात जास्त विकसित होणारे शहर होते. मात्र मतदारांनी चुकीचे राजकीय नेते या शहरातला निवडून दिल्यामुळे शहराची संपुर्ण वाट लागली आहे असा आरोप यावेळी राज ठाकरेंनी केला.

राजकीय नेते केवळ मतदान मिळवण्यासाठी तुमच्या मनात जातीपातीचे राजकारण करून भिती निर्माण करतात व निवडणूक जिंकून येतात. गेल्या वेळी शहरात घडलेली दंगल ही त्याचाच एक भाग असून शहरातील वातावरण खराब करण्यासाठी ही दंगल काही राजकीय नेत्यांनी घडवून आणली होती, असा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला.

तसंच मराठा मोर्चाच्या वेळी वाळूज औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांनी तोडफोड केली होती, असे पोलिस तपासात समोर आले. याचा आर्थ काय तर परप्रांतीय लोक आपल्या राज्यात येऊन रोजगार मिळवतात आणि अशा प्रकारे आपल्या शहराचे नुकसान करतात असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तोडफोडीत मराठा क्रांती मोर्चाचे तरुण नव्हते असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People dont vote on basis of development says raj thackeray
First published on: 30-08-2018 at 20:52 IST