सतीश कामत

काळाच्या ओघात मृतवत झालेला ओढा दोन वर्षांच्या चिकाटीच्या प्रयत्नांनंतर पुनर्जीवित करण्यात संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील ग्रामस्थांना यश आले आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर असलेल्या या गावातून वाहणारा ओढा गेल्या काही वर्षांमध्ये दगड-गोट्यांनी भरून गेला. त्यामुळे त्याला येऊन मिळणारे झरेही बंद झाले. बारमाही वाहणाऱ्या ओढ्याचा प्रवाह थांबला. तसेच ओढ्याच्या दोन्ही काठांवरील विहिरींचे पुनर्भरण थांबल्याने पाणी पातळीत घट झाली.

या आपत्तीवर मात करण्याबाबत ग्रामस्थ विचार करत असतानाच शेजारच्या साखरपा येथील नदीतील गाळ काढण्याचे काम ‘नाम फाऊंडेशन’च्या मदतीने झाल्याची माहिती मिळाली. त्या दृष्टीने ग्रामस्थ नीलेश कोळवणकर यांनी श्रीधर कणबरकर आणि ‘नाम’चे तांत्रिक मार्गदर्शक अजित गोखले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिल्यानंतर ‘जलसमृद्धी योजना देवळे’ या मोहिमेंतर्गत प्रत्यक्ष कामाला आरंभ करण्यात आला. अर्थात हे करण्यासाठी आर्थिक साहाय्य गरजेचे होते. ग्रामस्थांना त्यासाठी आवाहन केल्यानंतर साडेसहा लाख रुपये जमा झाले. त्यामध्ये ग्रामपंचायतीने दीड लाख रुपयांची भर टाकली.

अशा प्रकारे निधीची तरतूद झाल्यावर ‘नाम फाऊंडेशन’ने दिलेल्या यंत्रसामग्रीच्या मदतीने ओढा खोलीकरणाच्या कामाला गेल्या वर्षी प्रारंभ झाला. सुमारे ४० टक्के काम पूर्णही झाले. पण १५ मे रोजी आलेल्या तोक्ते वादळामुळे खंड पडला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुमारे ६०० मीटरचे काम पूर्ण झाले. त्यामुळे देवळेच्या बाजारपेठेला गतवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसला नाही. हा परिणाम पाहून उत्साहित झालेल्या ग्रामस्थांनी यंदा एप्रिल महिन्यात उर्वरित काम हाती घेतले आणि उरलेल्या चौदाशे मीटर लांबीचे खोलीकरण आणि रुंदीकरण पूर्ण केले.

हे काम करताना तांत्रिक बाबींचाही विचार करण्यात आला. पावसाचे पाणी साचून राहण्यासाठी नैसर्गिंक कोंडी (डोह) तशाच ठेवल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात या कोंडींमध्ये सुमारे ६ ते ७ फूट पाणी साठले आहे. याचबरोबर, येथील पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्या मागे आणि पुढील पाच फुटांपर्यंत खोलीकरण केलेले नाही. काठावरील गाळ पुन्हा ओढ्यामध्ये जाऊ नये म्हणून या पावसाळ्यात ओढ्याकाठी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासाठी राजेश कोळवणकर यांनी पुढाकार घेतला असून दीपक शेट्ये यांनी स्थानिक जातींची सुमारे २०० रोपे दिली आहेत. हे वृक्षारोपणही ग्रामस्थ श्रमदानातून करणार असून सरपंच कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिला बचत गटाच्या सदस्य या रोपांची जोपासना करणार आहेत.

देवळेच्या सरपंच विजया कोरगावकर, यांच्यासह ज्ञानेश नसरे, दिनेश पारशेट्ये, जयेश काळोखे इत्यादींच्या पुढाकाराने ही मोहीम पूर्णत्वाला गेली. वाणे वाडी, कदम वाडी, चव्हाण वाडी, बौद्ध पंचायत येथील ग्रामस्थांनी यामध्ये मोलाचा हातभार लावला. कोळवणकर यांनी यापूर्वी या ओढ्याच्या पाण्यावर वांगी, मिरची इत्यादी पिके उन्हाळ्यात घेतली होती. पण त्या वेळी पाण्याचा तुटवडा जाणवला होता. या मोहिमेद्वारे पाण्याची हमी मिळाल्याने आणखीही काही शेतकरी उन्हाळी पिकांचे नियोजन करणार आहेत.

पुराची समस्या कायमची सुटली

दोन किलोमीटर लांबीच्या या ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून तो पूर्वीप्रमाणे प्रवाहित झाला आहे. ओढ्याच्या मार्गावरील सुमारे आठ कोंडीमध्ये (नैसर्गिक खड्डे) पाणी साचलेले आहे. त्याचबरोबर विहिरींचे पुनर्भरण चांगल्या प्रकारे होऊ लागले असून पुराची समस्याही कायमची सुटली आहे.