सोलापूर : आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असताना सांगोला तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील आणि शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब व डॉ. अनिकेत देशमुख यांच्यातील संघर्ष वैयक्तिक स्तरावर पोहोचला आहे. सांगोल्याचा लोकप्रतिनिधी निर्व्यसनी असला पाहिजे आणि हीच तरुणांची भावना आहे, अशा शब्दांत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांचा थेट नामोल्लेख टाळून टोला लगावला आहे.
अनेक वर्षे रखडलेल्या ८८३ कोटी रुपये खर्चाच्या सांगोला उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचा दावा आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी अलिकडेच केला होता. त्यानंतर त्यांचा सांगोल्यात सत्कारही झाला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी, गणपतराव देशमुखांच्या दोन्ही नातवांचे पार्सल त्यांच्या मूळगावी पेनूरला (ता. मोहोळ) परत पाठवून देईन, अशी गर्जना केली होती. त्यांच्या या विधानामुळे सांगोल्यात दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष वैयक्तिक स्तरावर गेला असतानाच शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा कठोर शब्दांत समाचार घेतला.
पंढरपुरात आयोजित भारत कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख आले असता त्यांनी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांना प्रत्युत्तर दिले. आगामी सांगोला विधानसभा निवडणुकीच्या निकालातून सूज्ञ मतदारच योग्य उत्तर देतील. आपला लोकप्रतिनिधी सुसंस्कृत, माणसांमध्ये रमणारा आणि महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी असला पाहिजे, अशी मतदारांची धारणा आहे. याच अनुषंगाने तरुणाई आणि मतदार जनता आपल्याकडे आकर्षित होत आहेत, असा दावा त्यांनी केला.