‘शेतक ऱ्यांना कर्जमाफी केल्यास आत्महत्या होणार नाहीत, याची हमी देणार का?’ असे वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी नगरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ (पुणे) या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी खासगी फौजदारी स्वरुपाची फिर्याद वकील वाजेद खान (बीड) यांच्यामार्फत दाखल केली आहे. फौजदारी दंड संहिता कलम १५६ (३) व भादवी ३०६ अन्वये ही फिर्याद आज, शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. टी. बनकर यांच्याकडे दाखल केल्याचे व पुढील सुनावणी दि. ९ मे रोजी ठेवण्यात आल्याचे वकील खान यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नगरसह महाराष्ट्रात आत्महत्या घडल्या, नगर मध्यवर्ती असल्याने नगरमध्ये फिर्याद दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

हेमंत पाटील यांनी फिर्यादित म्हटले की, १६ मार्चला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वरील वक्तव्य केले. शेतकरी आत्महत्या ही सर्वात गंभीर बाब आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे टाकळीमाळी (औरंगाबाद) येथील विष्णु बुरकुर या शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली. नगरमध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.