सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचे १२ लाख रुपयांचे बिल मिळत नसल्यामुळे गुत्तेदाराने १० ते १२ गुंडांच्या मदतीने जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता गंगाधर कुंभार यांच्या घरावर मंगळवारी रात्री सशस्त्र हल्ला चढवला. अभियंत्याच्या घरावर पेट्रोल गोळा टाकून, तसेच घरातील सामानाची तोडफोड करीत पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेत अभियंत्यासह त्यांचा मुलगा जखमी झाला. या घटनेने बीड शहरात दहशत निर्माण झाली असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहराच्या मित्रनगर भागात राहात असलेले जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता गंगाधर कुंभार यांच्या कार्यक्षेत्रातील अंथरवणिपप्री येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम वर्षभरापूर्वी बाळू पवार नावाच्या गुत्तेदाराने केले होते. या कामाचे बिल मिळत नसल्याच्या कारणावरून मंगळवारी रात्री बाळू पवार व शाखा अभियंता कुंभार यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. पवार यांनी धमकावून मारहाण केल्याने कुंभार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुंभार आपल्याविरुद्ध तक्रार देण्यास गेल्याचे कळताच पवार याने १० ते १२ लोकांना सोबत घेऊन रात्री अकराच्या सुमारास कुंभार यांच्या घरावर हल्ला चढवला. खिडक्यांच्या काचा फोडत, घरावर पेट्रोलचे पेटते गोळे टाकले. दारासमोरील दुचाकीही पेटवून देण्यात आली.
या प्रकारामुळे घरातील महिला व मुलांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरूकेला. दरवाजा तोडून गुंड घरात घुसले. घरातील दूरचित्रवाणी संचासह कपाटे, तसेच दिसेल त्या वस्तूंची तोडफोड करण्यात आली. लहान मुले व महिलांनी आरडाओरड करूनही कोणी मदतीला आले नाही. सुडाने बेभान झालेल्या आरोपींच्या हल्ल्यात शाखा अभियंता कुंभार व त्यांचा मुलगा मनीष जखमी झाले. आरोपींनी घरासमोर पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. जवळपास अर्धा तास हल्लेखोरांनी हातात पडेल त्या वस्तूंची तोडफोड करून गोंधळ घातला.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सविता कुंभार यांच्या तक्रारीवरून बाळू पवारसह १२ लोकांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुत्तेदारीच्या बिलासाठी शाखा अभियंत्याच्या घरावर सशस्त्र हल्ला करण्याच्या घटनेने अधिकाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2015 रोजी प्रकाशित
घरावर पेट्रोल गोळा टाकून हवेत गोळीबार
सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचे १२ लाख रुपयांचे बिल मिळत नसल्यामुळे गुत्तेदाराने १० ते १२ गुंडांच्या मदतीने जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता गंगाधर कुंभार यांच्या घरावर मंगळवारी रात्री सशस्त्र हल्ला चढवला.

First published on: 08-01-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol on house and firing