खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारासाठी आणलेल्या खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टर पायलटला मारहाण केल्याप्रकरणी चार दिवसांनंतर फौजदार धरमसिंह चव्हाण यांच्या तक्रारीवरून भाजपचे प्रचारप्रमुख प्रवीण घुगे यांच्यासह १० कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड लोकसभेचे उमेदवार गोपीनाथ मुंडे ३ एप्रिल रोजी शिवसंग्राम संघटनेच्या मेळाव्यासाठी मुंबईहून रेमंड या खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरने दुपारी आले. मेळावा झाल्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मदानावर हेलिपॅडवर मुंडेंच्या गाडय़ांचा ताफा आला. मुंडे यांनी पायलटला केज तालुक्यातील विडा येथे चलण्यास सांगितले. मात्र पायलटकडे मुंबई ते बीड, बीड ते परळी असाच मार्ग आखून दिलेला अक्षांश रेखांश होता. त्यामुळे पायलटने विडा येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल आणि त्यासाठी एक तास लागेल असे सांगितले. त्यावेळी मुंडेंनी तुम्हारा हमेशाही प्रॉब्लेम रहता है, असे म्हणताच पायलटने आप तमीज से बात करो, असे प्रतिउत्तर दिले. त्यावेळी आजूबाजूला भाजपचे कार्यकत्रे उपस्थित होते. कार्यकर्त्यांसमोर वाद नको म्हणून मुंडे गाडीत बसून निघून गेले. मुंडे जाताच साडेपाचच्या सुमारास तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पायलटला घेरले आणि साहेबांशी उद्धट वर्तन का केले म्हणत मारहाण केली. नियुक्तीवर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून पायलटला वाचवले. घटनेनंतर लगेचच पायलटने हेलिकॉप्टर घेऊन औरंगाबाद गाठले. या घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी ६ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांच्या तक्रारीवरून भाजपचे प्रचार यंत्रणेचे प्रमुख प्रवीण घुगे, कार्यकत्रे स्वप्नील गलधर, राजेंद्र बांगर यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले, घटना घडली त्यावेळी हेलिपॅडवर पोलीस डय़ूटीवर होते, त्यांच्यासमोर पायलटला मारहाण झाली. त्यांचा जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पायलटची तक्रार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2014 रोजी प्रकाशित
पायलटला मारहाणप्रकरणी प्रवीण घुगे यांच्यावर गुन्हा दाखल
खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारासाठी आणलेल्या खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टर पायलटला मारहाण केल्याप्रकरणी चार दिवसांनंतर भाजपचे प्रचारप्रमुख प्रवीण घुगे यांच्यासह १० कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 07-04-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilot beating pravin ghuge offence beed