लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर: यंदाच्या आषाढी वारीमध्ये ‘हरित वारी स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आधारित वारीमध्ये पर्यावरण साक्षरतेचा जागर होणार आहे. गेल्या वर्षी दहा हजार वृक्ष लागवड पालखी मार्गावर प्रशासनाकडून करण्यात आली होती. यंदा अधिकची वृक्ष लागवड करून प्लास्टिक संकलन केंद्र उभा करून पर्यावरणाचा जागर करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिला वारकरऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, स्वतंत्र महिला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. दरम्यान,आषाढी एकादशी २९ जून रोजी आहे.

आषाढी वारी नियोजनाबाबत येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपल्हिाधिकारी शमा पवार,उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मंदीर समिचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, कबीर महाराज, राणा महाराज वासकर, विश्वस्त, फडकरी, दिडींकरी, नागरिक, व्यापारी संघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

आणखी वाचा-कासवरील त्या बांधकामांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्यावा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले, महिला भाविकांच्या आरोग्य विषयक स्वच्छता तसेच सुरक्षेसाठीच्या विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी संबधित ठिकाणी महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा देण्यात येणार आहेत.पालखी मार्गावर उपलब्ध सुविधेबाबत दिशदर्शक फलक लावावेत अशा सूचनाही स्वामी यांनी यावेळी दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेपांडे म्हणाले, आषाढी यात्रा कालावधी वारकरी, भाविक व नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य दिले आहे.पालखी मार्गावरील बंदोबस्त तसेच वाहतूक याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात येणार असून यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. राज्य शासनाने आषाढी यात्रा कालावधीत जादा एस.टी. बसेस सोडण्याचे नियोजन केले असून यात्रेत महिला भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता लक्षात घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच शहरात १६२ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. आषढी सोहळा निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी वारकरी, भाविकांनी तसेच नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीत विश्वस्त, फडकरी, दिडींकरी, व्यापारी व नागरिकांनी सूचना मांडल्या या सूचना बाबत तात्काळ संबधित विभागाने कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.