शिर्डीच्या या पावनभूमीला माझे कोटी कोटी नमन! पाच वर्षांपूर्वी या पवित्र मंदिराला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी मला साई दर्शनाची संधी मिळाली होती. आज साईबाबांच्या आशीर्वादाने साडेसात हजार कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं आहे. महाराष्ट्राला पाच दशकांपासून ज्या निळवंडे धरणाची प्रतीक्षा होती ते कामही पूर्ण झालं आहे. मी हे माझं भाग्य मानतो की तिथे जलपूजनाची संधी मला मिळाली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मंदिराशी जोडलेल्या गेल्या ज्या प्रकल्पांचं लोकार्पण झालं आहे त्यांचं भूमिपूजनही मी केलं होतं. आता देश-विदेशातल्या श्रद्धाळूंना दर्शनासाठी सुलभता येईल. असंही मोदी यांनी म्हटलं. तसंच बाबा महाराज सातारकर यांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली.

बाबा महाराज सातारकर यांना आदरांजली

आज मी बाबा महाराज सातारकरांच्या निधनाचं वृत्त ऐकलं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना मी करतो. बाबा महाराज सातारकर हे देशाचं वैभव होते. वारकरी संप्रदायाचा गौरव असलेले बाबा महाराज सातारकर आज वैकुंठवासी झाले. त्यांनी त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून जे जनजागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. बाबा महाराज सातारकर हे अत्यंत साधेपणाने आणि सरळ संवाद साधत असत. बाबा महाराज सातकरकर यांची वाणी आणि शैली लोकांचं मन जिंकत असे. त्यांच्या वाणीमध्ये कायमच जय जय रामकृष्ण हरी या भजनाचा प्रभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मी आज त्यांना श्रद्धांजली वाहतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- बाबा महाराज सातारकर: फर्निचरचे व्यावसायिक ते ज्येष्ठ निरुपणकार! कीर्तनकार होण्याआधी वडिलांना काय सांगितलं?

प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरीब कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे

देशाला गरीबीपासून मुक्ती मिळाली पाहिजे. गरीबांना पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे हाच सच्चा न्याय आहे. आपलं सरकार सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन पुढे चाललं आहे. आमची प्राथमिकता गरीबांचं कल्याण आहे. आज देशाची अर्थव्यवस्था वाढते आहे. त्यात गरीब कल्याणासाठी सरकारचं बजेटही वाढतं आहे. आज महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्मान कार्ड दिले जात आहेत. या कार्डधारकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत असणार आहेत असंही मोदी यांनी जाहीर केलं आहे. या योजनेसाठी ७० हजार कोटी केले आहेत. गरीबांच्या घरांसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च केले. २०१४ च्या आधीच्या दहा वर्षांच्या तुलनेत हे सगळे खर्च सहापट जास्त आहेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे.