मामा—भाच्यात वाद झाले. त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्या वादातून मामा विष प्यायला तर घाबरलेल्या भाच्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे ही घटना घडली आहे.
टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय ३०) व त्यांचा भाचा मनोज चव्हाण (वय २२) हे तेथेच शेतात वस्ती करून राहतात. खंडागळे यांनी काही जमीन त्यांच्या बहिणीला दिली आहे. त्यामुळे मामा—भाचे दोघेही मिळून शेती करीत. काल मामा—भाच्यात किरकोळ वाद झाला. त्यातून मामा नवनाथ खंडागळे यांनी कीटकनाशक प्राशन केले. मामाने कीटकनाशक प्यायल्याचे पाहून घाबरलेला भाचा मनोज याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारली.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन नवनाथ खंडागळे यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर इतरांनी विहिरीतील भाचा मनोज याचा शोध सुरू केला. मात्र, अंधार पडल्याने त्याचा शोध लागला नाही.
आज सकाळी पोहण्यात पटाईत असलेले रावसाहेब बनकर यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान नवनाथ खंडागळे यांच्यावर येथील रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. टाकळीभानचे पोलीस हवालदार रवींद्र पवार, गोरे, बाबा सय्यद यांनी घटनेचा पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर आज मयत मनोज याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
