जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या प्रकरणावरुन पोलीस भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात कारवाई करत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या म्हणजेच शनिवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (शुक्रवारी) पहाटे भाजपा समर्थकांसहीत गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र त्यापूर्वीही पडळकर यांनी असा प्रयत्न गुरुवारी केला होता अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली असून याच प्रकरणात पडळकरांविरोधात कारवाई केली जात असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन या प्रकरणासंदर्भातील कारवाईची माहिती दिली आहे. “काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा आ.गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करत आहेत. उद्या रीतसर दि.१३/०२/२०२१ रोजी दु.४:३० वा.आदरणीय पवार साहेबांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे,” असं देशमुख म्हणाले आहेत.

पडळकर यांनी या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभारण्यात आला असून करोनामुळे मागील वर्षापासून त्याचा अनावरण सोहळा रखडला होता. मात्र पडळकर यांनी पवारांच्या हातून उद्घाटन नियोजित असतानाच स्वत: जाऊन या पुतळ्याचं उद्घाटन केलं. या उद्घाटनानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचं पडळकर यांनी सांगितलं. आहिल्याबाईंचं काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होतं. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही गनिमी काव्यानं जाऊन पुतळ्याचं अनावरण केल्याचंही पडळकर म्हणाले.

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण करणं ही अपमानास्पद बाब असून आहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी त्यांचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळेच आम्ही युवा कार्यकर्त्यांच्या सोबत जेजुरीमधील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गडावर आलोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले. पुतळ्याचं उद्घाटन करुन गडावरुन खाली उतरताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकर यांचे स्वागत केलं. यासंदर्भातील व्हिडीओ पडळकरांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलाय.