काही लोकांनी आपल्याला प्रतिकार केल्याचा राग डोक्यात धरून पोलीसांनी अकोल्यातील कापसी गावातील घरांमध्ये घुसून महिला, वयोवृद्ध व लहान मुलांसह अनेकांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. पोलीसांनी गरदोर महिलेसह चार वर्षांच्या मुलालाही अमानुष मारहाण केल्यामुळे पोलीसांच्या या कृतीविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. पोलीसांनी घराबाहेर लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचीही तोडफोड केली.
अक्षयतृतीयेनिमित्त दरवर्षी कापसी बाहेर असलेल्या तलावाच्या काठी जुगार खेळला जातो. आसपासच्या परिसरातून अनेक लोक जुगार खेळण्यासाठी येथे येतात. जुगार खेळणाऱया व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी काही पोलीस गणवेश न घालता साधे कपडे घालून गावाजवळ पोहोचले. यावेळी जुगार खेळणाऱया व्यक्ती आणि पोलीसांमध्ये बाचाबाची झाली. सुमारे १५० लोक तिथे उपस्थित होते. काही व्यक्तींनी पोलीसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन पोलीस जखमी झाले. त्यानंतर जुगार खेळणाऱया व्यक्ती तेथून पळून गेल्या. जुगार खेळणाऱया व्यक्ती गावांमध्ये पळून गेल्याचे समजून पोलीसांनी अधिक फौजफाटा बोलावून गावातील घरांमध्ये घुसून तेथील सर्वच लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीसांनी अक्षरशः घरांचे दरवाजे तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि महिला, वयोवृद्ध व्यक्ती व मुलांसह अनेक निरपराध व्यक्तींना काठ्यांनी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. घरांमध्ये जुगार खेळणाऱया व्यक्ती लपून बसलेल्या नसतानाही पोलीसांनी तिथेही घुसून तिथे राहणाऱयांना जबरदस्त चोप दिला. पोलीसांच्या मारहाणीत एक गरोदर महिला आणि एक चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीसांनी घराबाहेरील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
जुगार खेळणाऱयांनी पोलीसांना हप्ता न दिल्यानेच त्यांनी यावेळी जुगार खेळणाऱया व्यक्तींवर कारवाई केल्याचा आरोप शिवसेना नेते गुलाबराव गावंडे यांनी केला. अकोल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना हे जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत आणि सर्वांचा आवाज दाबण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, पोलीसांनी निरपराध गावकऱयांना बेदम चोप दिल्याने संपूर्ण जिल्ह्यात पोलीसांच्या या कारवाईचा निषेध करण्यात येतो आहे.
(संग्रहित छायाचित्र)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police beaten up many villagers at kapsi in akola
First published on: 22-04-2015 at 10:49 IST