नगर: मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. चालक पदासाठी दि. २६ मार्चला, तर शिपाई पदासाठी दि. २ एप्रिलला लेखी परीक्षा होणार आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. 

मुंबईवगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. नगर जिल्हा पोलीस दलातील १० चालक पदासाठी ९३ उमेदवार, तर पोलीस शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी १६०६ उमेदवार पात्र ठरवले गेले आहेत. लेखी परीक्षा ९० मिनिटांची व १०० गुणांची असेल. त्याचे स्वरूप ‘ऑब्जेक्टिव्ह’ असेल.

 जिल्हा पोलीस दलातील चालक व शिपाई अशा १३९ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. एकूण ११२७८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी ६७०७ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. ३६६९ उमेदवार गैरहजर राहिले. दोन उमेदवारांनी हजर राहूनही चाचणी देण्यास नकार दिला. उपस्थित उमेदवारांपैकी ६७२१ उमेदवार जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या चाचणीसाठी पात्र ठरले. ८८३ उमेदवार चाचणीपूर्व तपासणीत पात्र ठरले होते.

चाचणी दिलेल्या ६७२१ उमेदवारांपैकी ३२७८ उमेदवार उत्तीर्ण झाले. ३४४३ उमेदवारांना २५ पेक्षा कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण ठरविण्यात आले आहे. चालकपदाच्या १० जागांसाठी २१९ उमेदवार उत्तीर्ण झाले, तर शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी ३०५९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. गुणानुक्रमानुसार त्यांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले गेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखी परीक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे

लेखी परीक्षेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. पात्र उमेदवारांना एमएच-आयटीकडून परस्पर हॉल तिकीट उपलब्ध केले जाणार आहे. ज्या शाळा, महाविद्यालय इमारतीत, खोल्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, तेथे परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे अन्यथा प्रत्येक वर्गात स्वतंत्र व्हिडिओग्राफर नियुक्त केला जाणार आहे. मैदानी चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे छायाचित्र व अंगठय़ाचा ठसा पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे. लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणारे उमेदवार तेच आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक ओला यांनी व्यक्त केली.