रत्नागिरी : रत्नागिरी जवळच असलेल्या मिरजोळे गावच्या भक्ती मयेकर या तरुणीचा मृतदेह १४ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत आंबा घाटातील दरी सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दुर्वास पाटील या तरुणाने दुस-या मुली बरोबर लग्न करण्यासाठी आपल्या दोन मित्रांच्या मदतीने भक्तीचा काटा काढल्याने या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करुन या खुनाचा छडा लावण्यात यश मिळविले.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विवेक पाटील व त्याच्या पथकाला भक्ती हिच्या नातेवाईकांच्या तक्रारी नंतर अवघ्या ८ तासात आरोपींना पकडण्यात यश आले आहे. भक्ती मयेकर हिच्या भावाने आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिल्यावर तात्काळ पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना दुर्वास पाटील यांच्या बरोबर भक्ती हिचे प्रेम संबंध असल्याचे उघड झाले. दुर्वास पाटील याला दुस-या मुलीबरोबर लग्न करायचे होते. मात्र ती आपल्या लग्नात अडथळा ठरत असल्याने भक्ती हिला त्याने खंडाळा येथे बोलावून घेतले. तेथे भक्ती मयेकरचा वायरने गळा आवळून आपल्या दोन साथीदारांसह गाडीत घालून तिला आंबा घाटातील दरीत ढकलून दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

याबाबत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १०३ (१)२३८ ६१ (२)१३८, १२७ (४)प्रमाणे तिघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ३० ऑगस्ट २०२५ रोजी दाखल करण्यात आला. या खून प्रकारणातील आरोपी दुर्वास दर्शन पाटील, (२५ वय) रा. जंगम वाडी वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी, विश्वास विजय पवार (वय ४१) रा. मु पो. कळझोंडी, बौध्दवाडी, ता.जि.रत्नागिरी तसेच सुशांत शांताराम नरळकर (वय ४०) रा. घर नं. ८८५, आदर्शनगर, वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दुर्वास पाटील याला पोलिसांनी पोपटासारखा बोलता केल्यावर त्याने आपण भक्तीला कसे बोलावले? तिला कसे मारले? आणि आंबा घाटात कसे फेकून दिले? हे सविस्तर सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी तब्बल १४ दिवसांनी दुर्वास पाटील याला घटनास्थळी नेऊन आंबा घाटा खाली असलेल्या दरीत तीस फुटांवर भक्ती हिचा मृतदेह असल्याचे दिसले. पोलीस पथकासह देवरुखातील राजू काकडे, विजय पाटील, दिनेश कांबळे, दिनेश गौरी, दीपक भोसले, सागर चाळके, दिग्विज गुरव, शंकर डाकरेयांच्यासह १५ तरुणांनी मृतदेह एका प्लास्टिक पिशवीत भरुन दरीतून वर काढण्यास मदत केली.

भक्ती हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तीच्या माने खालचा भाग सुस्थितीत होता. मात्र चेहऱ्यावर फक्त कवटी शिल्लक राहिलेली होती. भक्ती हिचा भाऊ हेमंत याने अंगावरचे कपडे व हातावर असलेला टॅटूवरुन तिचा मृतदेह ओळखला. भक्तीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आल्यावर रविवारी सकाळी शव विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर चर्मालय येथील स्मशान भूमीत तिच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.