मुन्ना देसाई व डॉ. लेले या दोघांमधील वाद संपुष्टात आलेला असताना हातखंबा येथे झालेल्या ‘त्या’ मारहाणीचे निमित्त करून भाजपचे माजी आमदार त्याचे राजकीय भांडवल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. मात्र त्यांचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे सांगतानाच येत्या विधानसभा निवडणुकीत आपण विजयाची हॅटट्रिक करून निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या २४ जानेवारीला रात्री शहराजवळील हातखंबा येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान जोरदार हाणामारीत झाले होते. तेव्हापासून तालुक्यातील राजकारण तापू लागले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आ. उदय सामंत यांच्यावर टीका करताना, पाली-हातखंबा-निवळी परिसरातील दहशतवादाला येथील लोकप्रतिनिधीच खतपाणी घालत असल्याचा आरोप केला होता. माने यांच्या त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आ. सामंत यांनी हातखंबा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. बाळ माने यांना आपण आपले प्रतिस्पर्धीच मानत नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका उद्या जरी झाल्या तरी त्याला आपली तयारी आहे. आपण हॅटट्रिक करणार आणि राष्ट्रवादीची विजयाची परंपरा कायम राखणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या आठ-साडेआठ वर्षांत आपण या मतदारसंघात कोटय़वधी रुपयांची विकासकामे केली असून, त्यामुळे येथील सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले माजी आमदार माने यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे आणि त्यातूनच ते आपल्यावर खोटे-नाटे आरोप करून आपणाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. हातखंबा येथील हाणामारी प्रकरणात आपण बाळ माने किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना गुंतवल्याचे त्यांनी शाबित केले, तर ते देतील ती शिक्षा भोगण्यास आपण तयार आहोत, असे सामंत यांनी सांगून खोटे-नाटे आरोप करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही असा दावा केला. या पत्रकार परिषदेला पंचायत समिती सदस्य बाबू म्हाप , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश सावंत, सचिन शेटय़े आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आर. डी. सामंत आदी उपस्थित होते. यावेळी या मारहाणीत गंभीर जखमी झालेले सचिन शेटय़े यांनी ‘मला माजी आमदार बाळ माने यांनी हॉकीस्टीकने जबर मारहाण केली’ असे पत्रकारांना सांगितले.