अलिबाग : रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला यंदा राजकीय रंग चढला असून, गोविंदांच्या थरांबरोबरच राजकीय थरही रचले जाणार आहेत. पालकमंत्रिपदामुळे तापलेले जिल्ह्याचे राजकीय वातावरण, पक्षांतर्गत गटबाजी तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका या साऱ्या पार्श्वभूमीवर यंदाची दहीहंडी राजकीय कुरघोडीचे मैदान ठरणार आहे. मात्र यात गोविंदा पथकांची चांगलीच चांदी होणार असून त्‍यांना लाखांच्‍या बक्षिसांचे लोणी चाखायला मिळणार आहे.

अलीकडच्या काळात दहीहंडी आणि गोपाळकाला हे केवळ धार्मिक-सांस्कृतिक उत्सव न राहता, सार्वजनिक व राजकीय इव्हेंटमध्ये परावर्तित झाले आहेत. अनेक ठिकाणी राजकीय नेते आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्या लावत आहेत. रायगड जिल्हाही त्याला अपवाद नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे टप्पे आले असून, त्याचे पडसाद आता उत्सवात उमटत आहेत.

मागील चार वर्षांपासून रखडलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका दिवाळीनंतर होणार हे आता निश्चित झाले आहे. जिल्‍हा परीषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूका तोंडावर आल्‍याने राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. गोविंदा पथके आणि ग्रामस्‍थांना खुश करण्‍यासाठी लाखो रूपयांची बक्षिसे ठेवण्‍यात आली आहेत. या बक्षिसांचे लोणी मटकावण्‍यासाठी गोविंदा पथके सज्‍ज झाली असून त्‍यांचा कसून सराव सुरू आहे. जिल्ह्यात तब्बल ८ हजार ५१० दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. यापैकी ६ हजार ६४२ खासगी आणि १ हजार ८६८ सार्वजनिक आहेत. शिवसेना, भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रमुख पक्षांकडून गोविंदांना लाखो रुपयांच्या बक्षिसांचे लोणी दाखवले जात आहे. सर्वच तालुक्यात एक लाखाहून अधिक रकमेच्या दहीहंड्या लावल्या जाणार आहेत. त्यामुळे गोविंदांना याचा लाभ होणार आहे.

बक्षिसांच्‍या रकमेची चढाओढ

अलिबाग आणि पाली येथे भाजपकडून २ लाख २२ हजार २२२ रूपयांची दहीहंडी, जाहीर करण्यात आली आहे. यावर मात करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) कडून तब्बल तीन लाखांची हंडी उभारण्यात येणार आहे. रोह्यात सुनील तटकरे मित्रमंडळाची मुख्य दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २ लाख २२ हजार २२२ रुपये आणि मानाचा गदा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा आमदार महेंद्र दळवी यांनीही स्पर्धेत उतरत दहीहंडी उभारण्याचा निर्धार केला आहे. अलिबागमध्‍ये शेकापच्‍या प्रशांत नाईक मित्रमंडळाकडून पुरूषांसाठी १ लाख ३१ हजार १११ रूपयांच्‍या बक्षिसांची हंडी तर महिलांसाठी ५१ हजार १११ रूपयांचे पारीतोषिक असणार आहे. शिवाय चार आणि पाच थर लावणारया पथकांना वेगळी बक्षिसे ठेवण्‍यात आली आहे. अंतिम विजेत्‍या संघाना चषक प्रदान केले जाणार असून आज त्‍यांचे अनावरण करण्‍यात आले. महाडमध्ये आमदार भरत गोगावले मित्रमंडळातर्फे देखील दहीहंडी स्‍पर्धा आयोजीत केली आहे.