दापोली: दापोली नगरपंचायतीमध्ये विद्यमान नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दापोली नगरपंचायतीवरची शिवसेना ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली आहे. नगरपंचायतीमध्ये १६ विरूध्द १ अशा मतांनी या अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. दापोली नगरपंचायतीच्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या विद्यमान नगराध्यक्षा ममता मोरे यांना त्याच्या पदावरून पायउतार करण्यासाठी सत्ताधारीपक्षाच्या नगरसेवकांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. व त्यांना दापोली नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र दिले होते.
त्यानुसार ममता मोरे यांच्या विरोधात एक पत्र २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यानुसार २ मे व ५ मे रोजी या ठरावावर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांची बैठक लावली. ही सभा घेण्यासाठी दापोलीचे उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले. दि. ५ मे रोजी सकाळी ११ वाजता दापोली नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरूवात झाली.
यात नगराध्यक्ष यांच्या विरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने १४ राष्ट्रवादीच्या नगरसेवक साधना बोत्रे, भाजपाच्या जया साळवी यांनी मतदान केले. तर ठरावाच्या विरोधात ममता मोरे यांनी मतदान केले. त्यानंतर प्राधिकृत अधिकारी यांनी नगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास ठराव १६ विरूध्द १ मतांनी पारित झाल्याचे जाहीर केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ममता मोरे यांनी या अविश्वास ठरावाच्या प्रक्रियेविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका जाहीर केली असून तेथे न्याय मिळेल. हा अविश्वास ठराव हा माझ्यावरील नसून दापोलीकर जनतेवरील असल्याचे सांगितले.
दापोली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत तत्कालीन शिवसेना व राष्ट्रवादी यांनी एकत्र येत तत्कालीन विद्यमान आमदार योगेश कदम यांच्याकडून शिवसेनेची सूत्रे काढून घेत ती सुत्रे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी एकत्रित निवडणूक लढवत शिवसेनेचे ६ व राष्ट्रवादीचे ८ असे १४ नगरसेवक निवडून आणले होते.
तर २ नगरसेवक योगेश कदम यांचे समर्थक तर १ नगरसेवक भाजपाचा निवडून आला होता. त्यानंतर राज्यात बदललेल्या परिस्थितीमुळे राष्ट्रवादीचे ८ पैकी ७ नगरसेवक व शिवसेनेचे ६ असे १३ नगरसेवक ठाकरे गटामध्ये सामील झाले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार योगेश कदम यांनी बाजी मारल्यानंतर पहिल्यांदा ५ व नंतर ७ नगरसेवकांनी अशा १२ नगरसेवकांनी ठाकरे गटामधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.
तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेविका साधना बोत्रे यांनी या गटासोबत न जाता आपल्याच पक्षात राहणे पसंत केले. त्यामुळे शिवसेनेकडे १४, भाजप १, राष्ट्रवादी १ असे संख्याबळ झाले होते. त्यामुळे नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव येणे ते क्रमप्राप्त होते. आता नगराध्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो व पुढचा नगराध्यक्ष कोण होतो. याकडे दापोलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.