सांगली : वारकऱ्याच्या ‘हरिनामा’च्या नामस्मरणाला सूर साज देणारी आणि पायी चालताना बाळगायला सोपी अशा अनोख्या वीणा या तंतुवाद्याची मिरजेत निर्मिती करण्यात आली आहे. वारी करताना वजनाला हलकी आणि ऊन, वारा, पावसामध्ये टिकाऊपणा येण्यासाठी या नव्या वाद्यामध्ये फायबरचा वापर केला असून, त्यावर टिकाऊपणासाठी मेटॅलिक रंग लावला आहे. या नव्या बदलामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांची वारी आता सुलभ होणार आहे. उद्याच्या आषाढी एकादशीवेळी अशा सुमारे दोन हजार वीणा पंढरीत विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
वारकऱ्यांची ओळख ही कपाळी काळा बुक्का, हाती टाळ, गळ्यात वीणा ही आहे. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरीची वाट तुडवत असताना वीणेच्या स्वरात विठ्ठल नामाचा जप करत असतात. वारकऱ्यांच्या गळ्यात असलेली वीणा वारीच्या वेळी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, परंपरागत वीणा वजनाला जड असून ऊन, वारा, पावसामध्ये त्यांचे नुकसानही होते. अशा वेळी हे जड वाद्य घेत शेकडो किलोमीटर अंतर पायी चालणे; ऊन, वारा, पावसामध्ये त्याची जपणूक करणे हे वारकऱ्यांना अवघड जाते. या अडचणी ओळखूनच मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांनी गेल्या चार महिन्यांपासून विशेष प्रयत्न करत ही नवीन वीणा तयार केली आहे.
वीणेसाठी महाडूक, देवदार (तून) या लाकडाचा प्रामुख्याने वापर केला जातो. या लाकडामुळे वाद्याला टिकाऊपणा येत असला, तरी वजन वाढते. अशी एक वीणा अडीच ते तीन किलो वजनाची असते. वीणा गळ्यात घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने पायी चालत असतात. त्यामुळे त्याचे वजन कमी असणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेउन कारागिरांनी वीणेच्या डेऱ्यासाठी फायबरचा वापर केला असून यामुळे नव्या वीणेचे वजन एक किलोने कमी होत ती अवघ्या दीड किलोची बनली आहे. वजनाला हलकी झाल्याने वारकऱ्यांच्या गळ्यातील वीणेचा भारही हलका झाला आहे. प्रत्येक दिंडीत एक वीणेकरी असतो. त्याला हे ओझे घेत शेकडो किलोमीटर अंतर चालावे लागते. याशिवाय हे वीणेकरी गावातील पारायण सोहळ्यातही सहभागी होत असतात. या वेळीही त्यांना ही जड वीणा सलग सात दिवस आणि सात रात्री बाळगावी लागते. या साऱ्यांमुळे वीणा वाद्याच्या वजनात बदल करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. याचाच विचार करून या वाद्यातील सर्वांत वजनदार असलेल्या डेऱ्याच्या भागासाठी या नव्या वाद्यात फायबरचा वापर केला आहे.
कारागीर मुबीन मिरजकर यांनी सांगितले, की एक वीणा तयार करण्यासाठी किमान आठ दिवसांचा अवधी लागतो. मिरजेत वीणा तयार करणारे शंभर कारागीर आहेत. यात सुरुवातीला लाकूड तासणे, खुदाई करणे, नक्षीचे रेखांकन करून देवदार लाकडाची नक्षी वीणेवर लावणे, तारांची जोडणी करणे, त्यानंतर रंगरंगोटी व शेवटी तारांची जोडणी या क्रमाने काम केले जाते. मात्र ही सर्व कामे एकाच कारागीराकडून होऊ शकत नाहीत. या सर्व कार्यपद्धतीत नव्या प्रकारची ही वीणा तयार करण्याचा संकल्प आम्ही घेतला होता. ही नवी एक वीणा तयार करण्यासाठी सात दिवसांचा अवधी लागला. गेल्या चार-चार महिन्यांत सततच्या कामातून तयार झालेल्या या दोन हजार वीणा पंढरीत विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. नव्या वीणेचा दर चार ते १५ हजार रुपयांपर्यंत आहे. मिरज शहरात मोहसीन मिरजकर, उस्मान गणी, नासीर मुा, शाहीद सतारमेकर, राजू सतारमेकर आदी तरुण कलाकार वीणा तयार करण्यात निष्णात असले, तरी अलीकडच्या काळात तरुण पिढी तंतुवाद्यनिर्मितीपासून लांबच राहत आहे. त्यामुळे मागणी असूनही गरजेप्रमाणे वीणा तयार होत नसल्याचे बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले.
वीणा या वाद्याची सर्वांत मोठी खरेदी ही पंढरपुरात आषाढी वारीवेळी होते. व्यक्तिगतरीत्या, तसेच दिंडी मंडळांकडून खरेदी केली जाते. याशिवाय काही सामाजिक संस्थाही वीणेची घाउक खरेदी करून वारकरी मंडळांना भेट देतात. दर वर्षी यासाठी मिरजेतून हजारो वीणा विक्रीसाठी पंढरीला पाठवल्या जातात. यंदा यामध्ये या नव्या प्रकारच्या दोन हजार वीणा पाठवल्या आहेत.बाळासाहेब मिरजकर
प्रसिद्ध तंतुवाद्य कारागीर
वीणेच्या डेऱ्यासाठी फायबरचा वापर केल्याने वीणेचे वजन एक किलोने कमी झाले आहे. यामुळे दिंडीतील वीणेकरी बुवाच्या गळ्यातील या वाद्याच्या वजनाचा भार हलका झाला असून पायी वारी करणाऱ्यासाठी आणि पारायणात अखंड वीणा वाजवणाऱ्यांना आता वीणा बाळगणे सुलभ होणार आहे.मुबीन सतारमेकर. तंतूवाद्य कारागीर.