कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय ‘फॅशन शो’मध्ये कोल्हापुरी चपलेचा वापर केलेल्या इटलीतील ‘प्राडा’ या कंपनीने नरमाईची भूमिका घेतली आहे. कोल्हापुरी चपलेबाबत या कंपनीने चर्चेची तयारी दर्शवली असून, पुढील आठवड्यात या कंपनीचे वरिष्ठ आणि भारतीय शिष्टमंडळ यांच्यात एक बैठक होणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी बुधवारी सांगितले.
इटली येथील प्राडा या कंपनीच्या उन्हाळी फॅशन महोत्सवात कोल्हापुरी चपलेचा वापर केला होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर या कंपनीने भारतीय कलाकुसरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून कारागिरांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली होती. प्राडाचे संचालक लोरेंझो बर्टेली यांनी याबाबत एक पत्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना पाठवले होते.
दरम्यान, भारतातून दबाव वाढल्यानंतर आता ‘प्राडा’ कंपनीने कोल्हापुरी चपलेच्या ‘फॅशन शो’मधील वापराबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. यानुसार ‘प्राडा’ आणि भारतीय शिष्टमंडळ यांची बैठक १० ते १२ जुलैदरम्यान होईल, असे चेंबर्सचे अध्यक्ष गांधी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
वाणिज्यमंत्र्यांकडे मागणी
दरम्यान, कोल्हापुरी चपलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न व्हावेत, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन नवी दिल्ली येथे केली आहे.