Praful Patel Local Body Elections in Bhandara Gondia 2025 : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष एकत्र दिसण्याची शक्यता जवळपास संपू लागली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधील स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे उभा राहणार आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी काही वेळापूर्वी भंडारा येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे. काही काही ठिकाणीच आणि आम्हाला जमल्यास महायुतीमधील पक्षांची युती होऊ शकते. परंतु, महायूतीच्या तिन्ही पक्षांनी निर्णय घेतला आहे. कारण सगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात. नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप मोठी गर्दी असते. सर्वांना न्याय देण्यासाठी सर्वांनी तसा निर्णय घेतला आहे.
“भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहोत”
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. तसेच स्थानिक स्तरावर काही वेगवेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे तिथला निर्णय तिथेच घ्यावा लागेल. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहोत. एखाद्या ठिकाणी कुठे तडजोड करायचा प्रसंग आल्यास आम्ही तशी तडजोड करू.
प्रफुल्ल पटेल यांचा भाजपाला इशारा?
“निवडणूक लढविण्यासाठी पैसा महत्त्वाचा असला तरी केवळ पैशाने निवडणूक जिंकता येत नाही, त्यामुळे कोणीही स्वतःला बाहुबली समजू नये”, असा सूचक इशारा प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिला. त्यांनी हे वक्तव्य करताना कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा थेट भाजपाला इशारा असल्याचं बोललं जात आहे.
