आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात गनोजा गावात एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली. यावर बच्चू कडू यांनी सौरभ इंगोले नावाच्या संबंधित कार्यकर्त्याला सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली. त्यात सौरभ इंगोले यांनी सर्व आरोप फेटाळले. “मला कुठलीही मारहाण झाली नाही, कानशिलात लगावली नाही. केवळ ‘थांब रे’ म्हटलं. विरोधकांना खोटी प्रसिद्ध हवी होती म्हणून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करण्यात आला,” असा आरोप इंगोले यांनी केला.

सौरभ इंगोले म्हणाले, “काहीही घडलं नाही. बच्चू कडू गावात रस्त्याच्या लोकापर्णासाठी गेले होते. काहीही न करता लोकांच्या नजरेत येण्यासाठी तो प्रयत्न होता. विरोधकांना काहीही न करता खोटी प्रसिद्धी हवी होती. नेता आणि कार्यकर्ता यांच्या दुरावा निर्माण करण्यासाठीचं षडयंत्र होतं.”

“रस्ता जिल्हा परिषदेपर्यंत होता आणि तो तिथपर्यंत का नाही असा त्यांचा प्रश्न होता. मी त्यांना हेच समजाऊन सांगत होतो की, निविदेत तो रस्ता तीन मीटर रुंद होता आणि आपण सहा मीटर केला. काही ठिकाणी साडेसहा आणि सात मीटरदेखील आहे. त्यामुळे त्या रस्त्याची लांबी कमी झाली. त्यामुळे तो रस्ता जिल्हा परिषद शाळेपर्यंत गेला नाही. मात्र, तो वारंवार तो रस्ता दाखवा असं म्हणत होता. त्यावर बच्चू कडू मी सांगतो म्हणाले. तो व्हिडीओ एडिट केलेला असू शकतो,” असं सौरभ इंगोले यांनी सांगितले.

व्हिडीओ पाहा :

बच्चू कडू काय म्हणाले?

बच्चू कडू म्हणाले, “गावातील एका कार्यकर्त्याने जाणीवपूर्वक पैसे घेऊन कार्यक्रम उधळून लावण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला. विरोधी पक्षातील एका कार्यकर्त्याने हे सर्व केलंय. मुद्दा इतकाच होता की रस्त्याच्या पाटीवर जो रस्ता लिहिला होता तो पाटीप्रमाणे गेला नाही. रस्ता बांधताना आपण नेहमी दोन्हीकडून काही भाग सोडून देतो आणि मध्यभागातून रस्ता बांधतो. मात्र, या गावात रस्त्याची रुंदी वाढली, त्यामुळे लांबी कमी झाली एवढा लहान विषय होता.”

“सौरभ इंगोलने गनोजा गावात खूप काम केलं. खरंतर ते माझ्यासाठीही आव्हान होतं. इतकं चांगलं काम केल्यानंतर त्याला आणि मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व्हिडीओत मध्येच कानशिलात मारल्याचा आवाज ऐकू येतो. मात्र, मी कानशिलात मारली नाही. केवळ हात करून थांब म्हटलं आणि मी त्या कार्यकर्त्याशी बोलतो असं सांगितलं. मात्र, मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला,” असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं.

बच्चू कडू पुढे म्हणाले, “काही माध्यमांचं मला आश्चर्य वाटतं. मारहाण म्हणजे लाथाबुक्क्यांनी मारलं तर मारहाण झाली म्हणतात. माध्यमांनी असे प्रकार करू नये. त्याचा कार्यकर्त्यांवर वाईट परिणाम होतो. असा विपर्यास करणं चुकीचं आहे.”

“मागील २०-२५ वर्षांपासून मी कार्यकर्त्यांना जपलं आणि कार्यकर्त्यांनी मला जपलं आहे. कोणत्याही पक्षाशिवाय, दिल्ली-मुंबईतील नेत्याच्या पाठिंब्याशिवाय मी आमदार आहे,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.

काय घडल्याचा आरोप?

गणोजातील रस्त्याच्या कामावर एका कार्यकर्त्याने गंभीर आक्षेप घेतले होते. बच्चू कडू या रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना या कार्यकर्त्याने हे आक्षेप बच्चू कडूंसमोरही मांडले. त्यावेळी बच्चू कडूंनी ठेकेदार आणि इंजिनियरसमोरच कार्यकर्त्याची बाजू ऐकून घेतली. मात्र, ठेकेदार रस्त्याचं काम योग्य झालं म्हणत होता, तर कार्यकर्ता कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होता.

रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं होतं त्या भागात रस्ता झाला नाही, असा प्रमुख आक्षेप तक्रारकर्त्या कार्यकर्त्याने केला. तसेच ज्या भागात रस्त्याचं काम झालं नाही तो कुठे गेला असा सवाल केला. यावर बच्चू कडू संतापले आणि तू मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं. त्यावर कार्यकर्त्यानेही बच्चू कडूंना प्रत्युत्तर देत मुर्खांना तुम्ही मुर्खात काढू नका, असं म्हटलं.

हेही वाचा : अमरावतीत सत्तारूढ आघाडीतील आमदार बच्चू कडू आणि रवी राणायांच्यातच संघर्ष सुरू 

यावर संतापलेल्या बच्चू कडूंनी तक्रारदार कार्यकर्त्याला तू पहिल्यांदा ऐकून घे, असं म्हटलं. अशातच गावातील प्रहारच्या एका कार्यकर्त्याने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडूंनी त्याला शांत बस असं सांगितलं. हे बोलताना बच्चू कडूंनी हात उगारल्याचं व्हिडीओत दिसत आहे.