scorecardresearch

“तर २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी – अमित शहांना तुरुंगात टाकू”, प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

पुणे येथील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी दारूड्याचे उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली.

Prakash Ambedkar on Narendra Modi Amit Shah
प्रकाश आंबेडकर, नरेंद्र मोदी व अमित शाह (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे. आगामी कालावधीत ही भीती आपल्याला दूर करायची आहे. आज या सभेच्या ठिकाणी एवढ्या प्रचंड संख्येने आपण जमलो आहोत. जर याचठिकाणी बीबीसीचा वृत्तपट आपण दाखवला असता तर सर्वांनाच पोलिस पकडू शकतील का? जर पकडले तरी एवढ्या लोकांना ठेवायला तुरुंगात जागा आहे का? झुकाने वाला चाहीये, सरकार झुकती है”, असे सांगत २०२४ मध्ये यांना झुकवा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. पुण्यातील खडकवासला येथे आयोजित केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदी यांची वृत्ती त्या दारूड्याप्रमाणे

माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात देशातील सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवले होते. मी अनेकवेळा विचारलं ते सोनं परत आणलं का? पण त्यावर कुणी उत्तर देत नाही. यावरुन देशाची परिस्थिती काय आहे ते बघा. आपल्या घरातलं सोनं जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही. त्यावरुन आपले घर आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो. एखादा दारूडा अशावेळी घरातली भांडीकुंडी विकून घर चालवतो. सगळं विकून झालं की दारूडा आपलं घरही विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी नेमके तेच करतायत की नाही सांगा? असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.

हे ही वाचा >> “चोराच्या मनात चांदणं” असं म्हणत प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ऐकेरी टीका, म्हणाले, “मोदीच्या मनात अजूनही…”

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे मात्र कौतुक केले. नेहरू यांनी अत्यंत कष्टाने देश उभा केला असे सांगताना ते म्हणाले की, डॉ. होमी भाभा यांच्या संशोधनाच्या आधारावर नेहरूंनी देशात कारखाने उभे केले. तेच कारखाने आज भारताचा आर्थिक कणा आहेत. मात्र तेच कारखाने मोदी दारूड्यासारखा विकायला लागला आहे, अशी जळजळीत टीका आंबडेकर यांनी केली.

माझ्या चार प्रश्नांची उत्तरे मोदींनी देऊन दाखवावी

घर चालवायला आपल्याला हजार रुपये लागत असतील आणि आपली कमाई ८०० रुपये असेल तर वरचे २०० रुपये कर्ज काढावे लागतात. त्याप्रमाणेच आज नरेंद्र मोदी कर्ज काढून देश चालवत आहेत. या कर्जासाठी कारखाने विकण्याचा सपाटा त्यांनी सुरु केला आहे. मला आणि पंतप्रधान मोदींना एकाच व्यासपीठावर बसवा. मी त्यांना चार प्रश्न विचारतो, त्यांनी त्याची उत्तरे देऊन दाखवावीत किंवा मोहन भागवत यांनी तरी समोर यावे. आर्थिक दृष्टीकोनातून या देशाचे वाटोळं करण्याचं काम सुरु आहे.

म्हणून अंबानी देश सोडून गेला

उद्योगपती मुकेश अंबानी देश सोडून निघून गेले याबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, ज्या वाझेने बॉम्ब ठेवला त्याच वाझेला आता माफीचा साक्षीदार केले जाणार आहे. आपल्याला चाकू मारणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच आरोपीला माफीचा साक्षीदार केल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल का? हेच अंबानीला लक्षात आले आहे. मोदींच्या व्यवस्थेत आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यामुळे ते देशच सोडून गेले. आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसोबत कायद्याची ही अवस्था आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 09:42 IST