Prakash Ambedkar demands Action against PM Modi under Jan Suraksha Act : राज्य सरकारने सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने देखील उडी घेतली असून पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या विधेयकाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी या विधेयकावरून विरोधी पक्षांवरही नाराजी व्यक्त केली आहे. “विरोधी पक्षांनी विधीमंडळाच्या सभागृहांमध्ये या विधेयकाला पुरेसा विरोध केला नाही. मात्र, विरोधी पक्षांचे नेते प्रसारमाध्यमंसमोर विरोध दर्शवत आहेत. ही त्यांची नौटंकी आहे”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भाजपने जनसुरक्षा कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता आणि आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राजकीय पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे.”

मोदी व भागवतांचे एके-४७ व टॉमी गनची पूजा करतानाचे फोटो उपलब्ध : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख म्हणाले, “आरएसएसचे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एके-४७ (AK-47) आणि टॉमी गन यांसारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहेत. भारतीय सैन्यात विशिष्ट सैनिकांनाच ही शस्त्रे वापरण्याची परवानगी आहे. असे असताना आरएसएसकडे ही शस्त्रे कुठून आली? सरकार त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार आहे की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या शस्त्रपूजेच्या फोटोंवर विरोधी पक्ष देखील शांत आहे.”

“मोदी व भागवतांवर कारवाई करावी”

“ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत, त्यांच्यावर या जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे की नाही? कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे कायदेशीर आहे, परंतु, एके-४७ आणि टॉमी गन यांसारखी शस्त्रे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे आणि हे राज्य उलथवून टाकण्यासारखे आहे. आरएसएस ही शस्त्रे जवळ बाळगतेय, त्यावर या कायद्यांतर्गत आधी कारवाई करावी.”

जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात पुरेसा विरोध झाला नाही : प्रकाश आंबेडकर

“जनसुरक्षा विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आक्रमकपणे विरोध झाला नाही. लोकांनी समाजमाध्यमांवर विरोध केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मीडियासमोर येऊन बोलणे ही केवळ नौटंकी आहे”, असं वंचितचे प्रमुख म्हणाले.

“कामगारांच्या मोर्चाला अर्बन नक्षलवाद म्हणणार का?”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कामगारांच्या मोर्चाला अर्बन नक्षलवाद म्हणणार का? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या विषयावर लढा उभा केला तर त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का? शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळत नाही, म्हणून त्याविरोधात आवाज उठवला तर त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का? खासगी सावकाराच्या विरोधात कारवाई करा, ही मागणी केल्यावर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार का? सरकार नेमकं कोणाला अर्बन नक्षलवाद ठरवणार आहे?

आरएसएसवर कारवाई करणार का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

ज्याच्याकडे शस्त्र, दारुगोळा आहे, त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवू शकता कारण, बेकायदेशीर मार्गाने तो राज्याला उलथवू पाहतोय. बेकायदेशीर मार्गाने राज्य उलथवणाऱ्यांकडे शस्त्र, दारुगोळा आहे की नाही ते तपासले पाहिजे. शस्त्र, दारुगोळा आरएसएसवाल्यांकडे आहेत. त्यांनी सार्वजनिकरित्या ती जाहीर केली आहेत. त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाची कारवाई करणार आहेत का? हा मोठा प्रश्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाठिशी उभे राहा”, वंचितचं विरोधकांना आवाहन

जर एखाद्या सामान्य नागरिकाने आरएसएसच्या शस्त्र, दारुगोळ्याची मोहन भागवत, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस पूजा करत आहेत याचे फोटो दाखवून त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागितली आणि यांना अर्बन नक्षलवादी म्हणून जाहीर करा, अशी मागणी केली तर त्या माणसाच्या मागे या सर्व राजकीय विरोधी पक्षांनी उभे राहिले पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने विरोधक आहेत, हे दिसेल.