वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अलिकडच्या काळात अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकाश आंबेडकरांचं कौतुक करत म्हणाले होते की, "बाळासाहेब (प्रकाश आंबेडकर) कधी कधी चांगले सल्ले देतात." आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची भाजपा-शिंदे गटाशी जवळीक वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुळात काही महिन्यांपूर्वी वंचितने शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. त्यामुळे आंबडेकर नेमके कोणत्या बाजूला आहेत असा प्रश्न त्यांचे राजकीय विरोधक उपस्थित करत आहेत. दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना आंबेडकर यांना फडणवीसांनी केलेलं कौतुक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या वाढलेल्या गाठीभेटींबद्दल प्रश्न विचारला. त्यावर आंबेडकर म्हणाले, ते मुख्यमंत्री आहेत आणि आपल्याला लोकांची कामं करून घ्यायची असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर अशा प्रकारच्या चर्चा करणं याला काहीच अर्थ नाही. आम्ही एकनाथ शिंदेंना सभागृहात म्हटलं होतं. तुम्ही या बाहेर, आम्ही तुमच्याबरोबर बसायला तयार आहोत. परंतु भाजपासोबत बसणं कठीण आहे, त्यांच्यासोबत आम्ही बसणारच नाही. हे ही वाचा >> “संपूर्ण ठाकरे गटच त्यांच्यातल्या तीन-चार लोकांमुळे असंतुष्ट, भविष्यात तुम्हाला…” देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भाजपाबरोबर येण्याची ऑफर दिली आहे. “प्रकाश आंबेडकर यांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो,” असं आठवले सोमवारी एका कार्यक्रमात म्हणाले.