सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे गेल्या आठवडय़ात स्वत:ची उमेदवारी जाहीर केलेले प्रकाश आंबेडकर हे येत्या २४ मार्च रोजी सोलापुरात येत आहेत. त्याच दिवशी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. तत्पूर्वी, उद्या बुधवारी दुपारी अब्दुलपूरकर मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे व सुजान आंबेडकर यांचे मार्गदर्शन होणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर लोकसभेची जागा लढविणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवडय़ात जाहीर केले होते. परंतु त्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण दिसत असतानाच अखेर पक्षाकडून आंबेडकर हे खरोखर सोलापुरातून लोकसभा लढविणार असून त्यासाठीच उद्या बुधवारी मेळावा आयोजिल्याचे माशाळकर यांनी सांगितले. या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे व सुजान आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर २४ मार्च रोजी स्वत: प्रकाश आंबेडकर हे देखील सोलापुरात येणार आहेत. त्याच दिवशी ते स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे माशाळकर यांनी सागितले. सोलापुरात काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे उभे आहेत. त्यांच्या विरोधात आंबेडकर हे खरोखर उभे राहिले, तर त्यांची उमेदवारी शिंदे यांच्यासाठी डोकेदुखीची ठरू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यामुळे आंबेडकर यांची उमेदवारी येऊ नये म्हणून काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar to file nomination from solapur lok sabha constituency
First published on: 20-03-2019 at 00:35 IST