सोलापूर : भारताच्या ऊर्जा सुरक्षेवरील अमेरिकेचा दबाव आणि फासीवाद-नवाफासीवाद आणि अंध राष्ट्रवाद यांचा वाढता धोका वेळीच ओळखा, अशा शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी महासचिव कॉ. प्रकाश करात यांनी राज्यस्तरीय अभ्यास शिबिरात शाखा सचिवांना मार्गदर्शन करताना सांगितले.
करात म्हणाले, भारताने इराण, व्हेनेझुएला आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेच्या दबावाखाली न येता स्वतंत्र ऊर्जा धोरण राबवावे. २०१९ मध्ये सुद्धा माकपच्या पॉलिट ब्युरोने अमेरिकेच्या एकतर्फी बंदिशांना अवैध ठरवत भारताने इराणकडून स्वस्त दरात तेल खरेदी सुरू ठेवावी, अशी भूमिका मांडली होती.
२०१९ मध्ये व्हेनेझुएलाकडून भारताने तेल खरेदी करू नये, या अमेरिकेच्या सूचनांवर अवलंबून न राहाता लोकहित लक्षात घेऊन देशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करावी. अशी भूमिका माकपने मांडली होती. आज रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याचा अमेरिकेचा दबाव लोकहिताविरुद्ध असून, नरेंद्र मोदी सरकारने तो ठामपणे नाकारावा, असे पक्षाने स्पष्ट केले. करात यांनी स्पष्ट केले की, भारताची ऊर्जा सुरक्षा लोकहितावर आधारित असावी.
अमेरिकेच्या दबावाला मान्यता देणे म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड आहे. माकपच्या शाखा सचिवांना फासीवाद, नवफासीवाद, अंध राष्ट्रवाद आणि प्रतिक्रियावादी प्रवृत्ती मार्गदर्शन करताना सांगितले की, आज फासीवाद-नवफासीवादाचा धोका, तसेच अंध राष्ट्रवाद व प्रतिक्रियावादी प्रवृत्तीमुळे लोकशाही व सामाजिक ऐक्याला गंभीर आव्हान निर्माण झाले आहे.