Prakash Mahajan on Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांना पक्षाच्या राज्यव्यापी शिबिराला निमंत्रित न केल्यामुळे ते नाराज होते. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. ‘पक्षाने मला साथ दिली नाही, पक्षाची सध्या दिवाळी सुरू आहे, पण माझ्या घरी अंधार आहे, पक्षात किंमत नाही. तुम्ही प्रवक्त्याला एवढे तुच्छ समजता का?’ अशा शब्दात महाजन यांनी आपली खंत व्यक्त केली होती. आता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांना फोन करून त्यांची मनधरणी केली आहे. यानंतर याचीही माहिती प्रकाश महाजन यांनी माध्यमांना दिली.
प्रकाश महाजन म्हणाले, “मला काल रात्री अमित ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली. मी माध्यमांकडे गेलो, याबद्दल त्यांची थोडी नाराजी होती. पण मी त्यांना सांगितले की, मी नाहीतर माध्यमेच प्रतिक्रियेसाठी माझ्याकडे आले होते. माझ्या भावनांचा बंध फुटला होता. पण अमित ठाकरे यांनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली. एवढ्या मोठ्या नेत्याचे चिरंजीव असूनही त्यांनी मला आश्वस्त केले की, ते माझी भेट घेणार आहेत.”
“अमित ठाकरे माझ्या मुलापेक्षाही लहान आहेत. मी त्यांना म्हटले की, अमितजी तुम्ही मला भेटायला येण्याची गरज नाही. तुम्ही बोलवा, मी येतो भेटायला. मी तसा काही दुराग्रही नाही. जे झाले ते चांगले नाही. पण पक्षात ज्येष्ठांना मान मिळावा, एवढीच माझी अपेक्षा आहे”, असे प्रकाश महाजन म्हणाले. यानंतर बाळा नांदगावकर यांचाही मला फोन आल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
राज ठाकरे माझा देव
तुम्ही नाराज आहात का? असा प्रश्न प्रकाश महाजन यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मी देव बदलणार नाही. हे कालही सांगितले आणि आजही सांगत आहे. मी गेलो तर राज ठाकरेंच्या खांद्यावरूनच जाईल. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर आवडलेला एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे.”
नारायण राणे प्रकरणात पक्षाने साथ दिली नाही
दरम्यान नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले असताना पक्षाने मला साथ दिली नाही, अशीही खंत याआधी प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली होती. “नारायण राणे यांच्या विषयात पक्षाने मला साथ दिली नाही. तरीही मी ते विसरलो. माझे काही चुकले असेल तर तुम्ही माझे कान धरू शकता. पण दोन्ही भाऊ (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आल्याने माझा काय फायदा होणार होता? मी जनभावना मांडली होती. मग यात मी काय वाईट केले? पक्षात देखील दोन मतप्रवाह होते. जर आम्हाला तुम्हीच काही किंमत देत नाहीत तर बाकीचे काय किंमत देतील, असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला होता.