फलटण येथील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. दरम्यान मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी या प्रकरणी आता रुपाली चाकणकर आणि जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मृत डॉक्टर महिलेचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून ही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रुपात अडकलेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. जयकुमार गोरे सारखे लोक हे मूळचे बाहेरचे आहेत, बाहेरून येताना त्यांनी सोबत रोग आणल्याची टीकाही महाजन यांनी केली.
प्रकाश महाजन यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
फलटण प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन मृत महिलेचे चॅट समोर आणले. त्यावरून प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली. रुपाली चाकणकरांनी त्या मृत महिलेचे चारित्र्यहनन केल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलं. ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. एवढं होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रुपात अडकलेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रणजीतसिंह निंबाळकर यांना कशी काय क्लीनचीट देऊ शकतात? चौकशीत ते जर निर्दोष असतील तर हरकत नाही. अशा प्रकारची माणसं तुमच्या भोवती गोळा होत असतील तर पक्ष बदनाम होणारच असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
जयकुमार गोरेंबाबत काय म्हणाले प्रकाश महाजन?
जयकुमार गोरे यांच्यावरही प्रकाश महाजन यांनी टीका केली. ते म्हणाले की, “जयकुमार गोरे यांनीही मृत महिलेच्या चॅटिंगवर भाष्य करत तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे यांचं लोकांनी काय काय दाखवलं नाही? ज्या महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप करण्यात आलं ते एक कोटी गोरेंकडे कसे आले हे ईडीने त्यांना विचारलं. त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार. हे कोणीही मूळ भाजपचे नाहीत, ते बाहेरून आले आहेत, त्यांनी बाहेरून येताना हा रोग आणला.” राज्याचा एक मंत्री असं कसं काय बोलू शकतो? समजा त्या महिलेची चॅटिंग असेल तर तुम्ही काय तिला आत्महत्या करायला लावणार का? असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला.
पाशा पटेल इतका मतलबी माणूस शोधून सापडणार नाही-प्रकाश महाजन
“पाशा पटेल इतका मतलबी आणि संधीसाधू माणूस सापडणार नाही. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचे निधन झालं आणि त्यांचं पार्थिव परळीत आलं, तेव्हा धनंजय मुंडेनी अंत्यसंस्कार करावे असं म्हणणारा पाशा पटेल होता. त्यानां माहिती नाही का गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी काय उद्गार काढले होते. त्यामुळे तो कसं काय वारस होऊ शकतो? पाशा पटेल यांना त्यांची मुलं वारस ठरवतील का हे बघावं. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा ठरवण्याचा हक्क हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि ओबीसी वर्गाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या वारस पंकजा मुंडेच आहेत असंही प्रकाश महाजन म्हणाले.
