कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मजमोजणी जवळपास पूर्ण होत आली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी होईल, हे जवळपास निश्चित झालं आहे. सध्या काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ६४ जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस पक्षाला १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. कर्नाटकमधल्या मतदारांनी भाजपाऐवजी काँग्रेसच्या झोळीत मतं टाकून काँग्रेसवर विश्वास दर्शवला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने जंग जंग पछाडलं होतं. तरीदेखील भाजपाला या राज्यात पराभव पाहावा लागला आहे.
कर्नाटक निवडणुकीसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा उमेदवारांचा प्रचार करत होते. पंतप्रधानांनी तब्बल आठवडाभर १५ पेक्षा जास्त सभा ५ ते ६ रोड शो केले. मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील भाजपा उमेदवारांच्या प्रचारात मागे राहिले नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक नेते. भाजपाचे वेगवेगळ्या राज्यांमधील मुख्यमंत्री, लोकप्रिय नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासह कर्नाटकातले सर्व मंत्री भाजपाचा जोरदार प्रचार करताना दिसले. परंतु मतदारांनी मात्र काँग्रेसवर विश्वास दाखवला. दरम्यान, आता या निवडणुकीच्या निकालावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निकालावार देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळ्या पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत असताना आता बॉलिवूड, टॉलिवूड, कॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दिग्गज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी कानडी भाषेत एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये प्रकाश राज यांनी म्हटलं आहे की, स्वाभिमानी कन्नडिगांना सलाम, ज्यांनी द्वेष पसरवणाऱ्या ढोंगी, नग्न सम्राटाला सत्तेपासून दूर केलं.
या ट्वीटसह प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक एडिटेड फोटो ट्वीट केला आहे.