सोलापूरचे कोविड केअर सेंटर पथदर्शी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात करोनाचा कहर वाढला असताना त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रशासनासमोरील आव्हान अद्यापि कायम आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूरचे कोविड केअर सेंटर यशस्वी उपाययोजनांच्या माध्यमातून चर्चेत आले आहे. एवढेच नव्हे तर हे कोविड केअर सेंटर संपूर्ण जिल्ह्यातील सर्व केअर सेंटरसाठी पथदर्शी बनले आहे.

शहरातील विजापूर रस्त्यावर छत्रपती संभाजी कंबर तलावालगत शासकीय केटरिंग कॉलेजच्या इमारतीत हे कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. येथील यशस्वी प्रयोग जिल्ह्यातील इतर कोविड केअर सेंटरमध्ये केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

दक्षिण सोलापुरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तेथील बाधितांसाठी २७ मे २०२० पासून हे कोविड केअर सेंटर कार्यरत झाले आहे. या सेंटरची ३३८ बाधित रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता आहे. सध्या १७८ बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. १३८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. येथे उपचार व सकस आहारासह नियमित योग व प्राणायामाचे धडे रुग्णांना दिले जातात. त्यासाठी रवी कंटल आणि शिवानंद पाटील हे योग प्रशिक्षक सेवाभावनेने कर्तव्य पार पाडत आहेत. प्राणायामामुळे रुग्णांची मानसिकता सकारात्मक बनते. तसेच श्वसनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तालुक्याचे आरोग्याधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड यांनी ही माहिती दिली.

करोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला प्रचंड भीती निर्माण होते. त्यांची मानसिकता खचून जाते. त्यांना मानसिक आधार देणे महत्त्वाचे असते. करोनाचा आजार बरा होऊ  शकतो, याची शाश्वती तथा विश्वास दिल्यास रुग्ण मानसिक धक्कय़ातून बाहेर येतो. त्यासाठी या कोविड केअर सेंटरमध्ये योग्य प्रकारे समुपदेशन करण्याबरोबरच रुग्णांना योग्य उपचार आणि सकस आहार दिला जातो. सोबत संगीत, गाणी, नृत्य अशी करमणूकही केली जाते. त्यामुळे रुग्णांमध्ये आपल्या आजारपणाची भीतीयुक्त जाणीव कायम न राहता ती दूर होण्यास मदत होते. त्यांना पुरेशी झोप मिळते आणि पर्यायाने त्यांची प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता रमेश शिंदे हे स्वत: शाहीर आहेत. त्यांच्याकडूनही शाहिरीची सेवा होते. एफएमचीही सेवा उपलब्ध आहे. दुपारी विश्रांतीसाठी संगीत, गाणी बंद ठेवली जातात. दिवसातून तीनवेळा डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी होते. रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासून औषधे देणे, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रतिजैविके देणे इत्यादी सेवेसाठी समन्वयक डॉ. प्रवीण खारे यांच्यासह पाच वैद्यकीय अधिकारी झटत आहेत. दिवसातून चारवेळा स्वच्छता केली जाते. पाच नोडल अधिकारी, सहा आरोग्यसेविका, पाच फार्मासिस्ट, दोन ब्रदर, पाच कक्षसेवक, एक तंत्रज्ञ, सहा शिपाई, चार होमगार्ड, तीन रखवालदार आणि बारा सफाई कर्मचारी याप्रमाणे अन्य मनुष्यबळ याठिकाणी कार्यरत आहे.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pranayama music songs and counseling in covid care center solapur zws
First published on: 26-07-2020 at 02:21 IST