दुधाच्या प्रश्नावर सखोल अभ्यास, चुलत्यांची राजकीय पुण्याई, सुसंस्कृत व तसे गंभीर, पण समोरच्या उमेदवाराची लष्कराची पाश्र्वभूमी असल्याने गंभीर स्वभावाचे प्रशांत परिचारक विनोद करण्यास गेले आणि चांगलेच पस्तावले. पंढरपूरच्या बाहेर फारसे परिचित नसलेल्या परिचारकांचे नाव देशभर झाले, पण त्यातून त्यांची बदनामीच अधिक झाली. परिचारकांचे चुकले आणि राष्ट्रवादी काँग्रेसने डाव साधला.

भारतीय लष्करी जवान व त्यांच्या पत्नींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे बेबजबाबदार विधान करून आमदार प्रशांत परिचारक हे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची आमदारकी दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. आता उच्चाधिकार समितीसमोर चौकशीस समोरे जावे लागणार आहे. राजकीय कारकीर्द धोक्यात आणणारे भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक यांचे नाव सध्या राज्यातच नव्हे तर देशभर वाईट अर्थाने गाजते आहे. पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीचे व पंढरपूरचे बुजूर्ग नेते सुधाकर परिचारक यांचे पुतणे असलेले आमदार प्रशांत परिचारक यांनी बेताल वक्तव्य करून स्वत:वर संकट ओढवून घेताना परिचारक घराण्यालाही गोत्यात आणले आहे. राजकारणात वावरताना दोन पिढय़ांतील अंतरही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सेवेकरी म्हणून मान असलेले परिचारक घराणे मागील शंभर वर्षांपासून पंढरपुरात सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहे. शतक महोत्सव साजरा केलेल्या पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या उभारणीत परिचारक यांच्या पणजोबांचा वाटा होता. या बँकेच्या शतक महोत्सवासाठी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी हे पंढरपुरात आले होते. सुधाकर परिचारक हे गेली सहा दशके राजकारण, सहकार, बँकिंग, शेती उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटविणारे नेते म्हणून गणले जातात. विश्वासार्हता आणि पारदर्शकता हीच ओळख बनलेल्या परिचारक यांचा राजकीय वारसा पुतणे प्रशांत परिचारक यांच्याकडे आला खरा; परंतु अल्पावधीतच त्यांनी स्वत:ची अडचण करून ठेवली आहे.

अकलूजच्या माळरानावर नंदनवन फुलविणारे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे सहकारी म्हणून सुधाकर परिचारक यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून अन्य विविध संस्थांमध्ये अनेक वर्षे कार्य केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुमारे ४० वर्षे संचालक मंडळावर असताना परिचारक यांना बँकेच्या तिजोरीचे संरक्षण करणारे ‘भुजंग’ असे गमतीने म्हटले जाई. आजारी सहकारी साखर कारखान्यांची प्रकृती ठणठणीत बरी करणारे निष्णात ‘वैद्य’ ही उपाधीही सुधाकर परिचारक यांना लाभली आहे. माळशिरस तालुक्यातील श्रीपूरचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना असो वा मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरचा भीमा सहकारी साखर कारखाना, हे दोन्ही आजारी असलेले साखर कारखाने परिचारक यांच्या ताब्यात दिले गेले. यात त्यांनी आपली विश्वासार्हता राखली. यापैकी पांडुरंग साखर कारखाना तर संपूर्ण राज्यात नावाजलेला आहे.

परिचारक यांच्या राजकीय वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकला असता १९७८ साली पंढरपूर विधानसभेची निवडणूक तत्कालीन जनता पक्षाच्या तिकिटावर परिचारक यांनी लढविली होती. नंतर १९८५ साली ते विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे सर्वप्रथम निवडून आले. पुढे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर ते शरद पवार यांना साथ देत २००९ पर्यंत आमदार राहिले. या संपूर्ण वाटचालीत मोहिते-पाटील यांचे विश्वासू सल्लागार म्हणून परिचारक यांना मोठा मान होता. किंबहुना परिचारक यांचा शब्द वगळून मोहिते-पाटील हे कोणताही निर्णय घेत नसत. त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद तब्बल आठ वर्षे सांभाळले. त्याचवेळी पुतणे प्रशांत परिचारक यांची जडणघडण होत गेली. पंढरपूर अर्बन बँकेसह सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे नेतृत्व आजतागायत प्रशांत हेच सांभाळत आहेत. शिवाय पंढरपूर कृषिबाजार समितीसह अभियांत्रिकी महाविद्यालयाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे.

सुधाकर परिचारक हे २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर निवडणूक राजकारणातून बाजूला पडले. त्याचवेळी आमदारकीसाठी ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे पंढरपुरात आले, तेव्हा त्यांच्या झालेल्या पराभवामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलली आणि परिचारक व मोहिते यांच्यात दुरावा निर्माण झाला तो कायमचाच. पुढे मोहिते-पाटील व पवार यांच्या संघर्षांत परिचारक यांची चांगलीच कोंडी होऊ लागली आणि ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले. मागील विधानसभा निवडणुकीत ‘तरुण तुर्क’ प्रशांत परिचारक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेत आमदारकी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश आले. परंतु खचून न जाता त्यांनी माढय़ाचे मोहिते-पाटीलविरोधक संजय शिंदे यांची साथ घेत सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून प्रस्थापित राष्ट्रवादीला तगडे आव्हान दिले. यात चमत्कार घडला आणि दोन्ही काँग्रेसची मते फोडून परिचारक हे आमदार झाले. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले. सोबत चुलते सुधाकर परिचारक यांची पुण्याईही होतीच. फडणवीस यांनीही सोलापूर जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसची पाळेमुळे उखडून भाजपचे कमळ फुलविण्याची जबाबदारी परिचारक यांच्यावर सोपविली. विशेषत: जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावून घेण्याच्या कामाला परिचारक व संजय शिंदे ही जोडगोळी लागली असतानाच निवडणूक प्रचारसभेत परिचारक यांनी लष्करी जवान व त्यांच्या पत्नीविषयी मुक्ताफळे उधळली. आणि ते चांगलेच अडचणीत सापडले. चुलते सुधाकर परिचारक यांचा सुसंस्कृत राजकीय वारसा घेताना त्यांच्याकडून वागण्या-बोलण्याचा मंत्र मात्र प्रशांत यांनी घेतलेला दिसत नाही.

राजकारणात परिचारक हे गंभीर स्वभावाचे म्हणून परिचित आहेत. एखाद्या गंभीर स्वरूपाच्या नेत्याने विनोद करताना भान बाळगायचे असते. नेमके तेथेच परिचारक चुकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका आमदाराने व्यक्त केली.

पराभवाचे उट्टे काढले

सोलापूर जिल्ह्य़ाच्या राष्ट्रवादीच्या राजकारणात मोहिते-पाटील यांना दूर करीत अजित पवार यांनी सूत्रे हाती घेतली. गेल्या वर्षी विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर रिंगणात उतरलेल्या परिचारक यांनी राष्ट्रवादीच्या दीपकआबा साळुंखे यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांवर परिचारक यांनी डल्ला मारला होता. तो राग राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होताच. संधी येताच राष्ट्रवादीने उट्टे काढले आहे.