सांगली: आंदोलनाची नौटंकी करत निवडणूक आयोगाला संशयाच्या भोवर्‍यात उभे करण्याचा इंडिया आघाडीचा डाव असल्याची टीका भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पेठ (ता. वाळवा) येथे केली.

पेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या वाळवा-शिराळा सहकारी दूधउत्पादक संस्थेच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सर्व आ. सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, अण्णा डांगे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँक संचालक राहुल महाडिक आदी उपस्थित होते.

दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या आंदोलनाच्या संदर्भात बोलताना आ. दरेकर म्हणाले, आयोगाच्या विरोधात राहुल गांधीसह सर्व विरोधी पक्षांची नौटंकी सुरू आहे. निवडणुकीमध्ये जनाधार मिळत नाही म्हणून विरोधी पक्ष झोपेचे सोंग घेत आहे आणि निवडणूक आयोगाला संशयाच्या भोवर्‍यात उभे करत आहे. या माध्यमातून त्यांचा राजकीय डाव आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली आहेत. तरीही निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना त्यांच्या मनात असलेली प्रश्नांच्या बाबतचे प्रतिज्ञापत्र करून द्यावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आपले मुद्दे आयोगाच्या मागणीनुसार प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावेत, असेही ते म्हणाले.

या वेळी प्रदेशाध्यक्ष आ. चव्हाण यांनी भाजपमध्ये कार्य करणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांना कामाची संधी दिली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून ताकदीने लढवल्या जातील. यामुळे पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, दूध उत्पादक शेतकर्‍यांनी केवळ दुग्ध उत्पादनावरच विसंबून न राहता उपपदार्थ निर्मितीवर भर द्यायला हवा. यामुळे उप पदार्थापासून चांगले उत्पन्न शेतकर्‍यांच्या हाती येउ शकेल. दुधापासून दर्जेदार उप पदार्थ तयार केले तर त्याला निश्‍चितच आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी राहील. यातून सामान्य शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला होउ शकतो. यासाठी वनश्री दूध संघाला शासन मदत करेल असेही आमदार चव्हाण म्हणाले.