परभणी : सध्या मराठवाड्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागानुसार अजून मान्सूनचे अधिकृत आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत पेरणी करण्याची घाई टाळावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कैलास कामाजी डाखोरे यांनी केले आहे. दरम्यान सध्या दररोजच सलग पावसाचे आगमन होत असले तरी मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतरही मोसमी पावसात तर खंड पडणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

मे महिन्याच्या शेवटी अधून मधून अवकाळी पाऊस होतो. या बिगर मोसमी पावसाच्याच दरम्यान शेतात खरीप हंगामपूर्व कामांची धांदल चाललेली असते. मात्र सध्या मोसमी पावसाप्रमाणेच वातावरण झालेले असून पावसातले सातत्य आश्चर्यकारक ठरले आहे. अवघ्या नऊ दिवसात जिल्ह्यात ८३.९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात मे महिन्यात झालेला हा अपवादात्मक असा पाऊस आहे. गुरुवारी (दि.२२) एकाच दिवशी तब्बल २६.१ मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात झाला. या दिवसात अक्षरशः पावसाळ्यासारखे वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये म्हणून कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने तशा सूचना दिल्या आहेत. मान्सूनपूर्व पाऊस ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी या पावसावर पेरणी केल्यास पुढील टप्प्यावर पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत कीड-रोगांचा प्रादुर्भाव, उशिरा होणारा पाऊस किंवा अचानक कोरडा पडल्यास पीक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या वातावरणात फक्त मशागत पूर्ण करून ठेवणे योग्य ठरेल असे या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत अजून काही ठिकाणी पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र हा पाऊस अपुरा व अनियमित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच्या दीर्घकालीन यशासाठी, खरीप हंगामातील पेरणीसाठी मान्सूनच्या स्थिर व सातत्यपूर्ण पावसाची वाट पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन, शेतातील “वापसा” स्थिती योग्य प्रकारे तयार करून मशागतीची कामे उरकावीत. यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर वेळेवर पेरणी करता येईल असेही आवाहन कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ महसूल मंडळांमध्ये १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस

परभणी जिल्ह्यात गेल्या नऊ दिवसात जोरदार पाऊस झाला १६ महसूल मंडळांमध्ये तब्बल १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यात झाला असून गेल्या नऊ दिवसात या तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद १२७.९ मिलिमीटर अशी आहे. दरम्यान सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे तापमान अतिशय कमी झाले असून आज दुपारी ३१ अंश सेल्सिअस अशी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.