पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जलसाठे तळाशी
गेल्या चार-पाच दिवसांत दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यांतील काही भागांत अचानक कोसळलेल्या पावसामुळे तेथील साखळी बंधाऱ्यांमध्ये जलसाठा झाला आहे. सातारा जिल्ह्य़ातील कोयना, धोम, कण्हेर धरण क्षेत्रासह कराड व सातारा तालुक्यातील काही भागात मंगळवारपासून पाऊस झाला आहे. गुरूवारी सायंकाळी ४ वाजता कराड शहरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा तळ गाठून असला, तरी तुलनेत सातारा जिल्ह्य़ातील जलसिंचन प्रकल्पांत बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध असल्याची आकडेवारी आहे. कोयना शिवसागराचा पाणीसाठा गेल्या २४ तासांत ०.७९ टीएमसीने कमी होऊन तो १३.२१ टीएमसी म्हणजेच १२.५५ टक्के एवढा आहे. कोयना धरणात सुमारे ८ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा असून, आणखी काही आठवडे सिंचन व ऊर्जा निर्मितीची वाटचाल या पाणीसाठय़ातून होऊ शकते. सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरणातील अचल पाणीसाठाही वापरला जात असून, धरणात उणे ५२.०५ टक्के पाणीसाठा आहे.
जलसंपदा खात्याच्या दफ्तरी १ जूनपासून नव्या तांत्रिक वर्षांस प्रारंभ झाला आहे. यंदा मान्सूनचे आगमन लांबत असल्याने कोयना धरणावरील पर्जन्य नोंदवही उशिराच हाताळली जाईल, असा अंदाज होता. मात्र, बुधवारी व गुरूवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने या वहीत नोंद होऊ लागली असून, कोयना धरणक्षेत्रातील कोयनानगरला ९, नवजा येथे २२, तर बामणोलीला ९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तारळी धरण येथे २६ मिमी, तर कण्हेर धरणावर ४ मिमी पाऊस झाला आहे. दिवसभरातील कमालीच्या उष्म्यानंतर सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये सातारा जिल्ह्य़ातील उरमोडी प्रकल्पाचा पाणीसाठा सर्वाधिक ३७.८० टक्के (३.७६ टीएमसी) असून, याच जिल्ह्यातील तारळी प्रकल्पाचा पाणीसाठा ३०.२९ टक्के (१.७७ टीएमसी) आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना धरणात १३.२१ टीएमसी म्हणजेच १२.५५ टक्के पाणीसाठा आहे.
कमालीचा उष्मा आणि पाणी टंचाईमुळे मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य जनता व शेतकऱ्याला मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचा हवामान खात्याच्या अंदाजाने धक्का बसला आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने सुखद गारवा निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre monsoon rainfall in maharashtra
First published on: 03-06-2016 at 01:51 IST