कराड : छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले पुतळा सुशोभीकरण तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक व संविधान स्तंभ याचे आराखडे नगरपालिकेने तयार केले आहेत. त्याचे सादरीकरण कराड नगरपालिकेच्या सभागृहात करण्यात आले.

स्मारक आराखड्यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत विविध सूचना नागरिक, माजी नगरसेवक व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. यातील योग्य सूचनांचा समावेश करून ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत विकास आघाडीचे नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी दिली.

राजेंद्र यादव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. वास्तुविशारद आदित्य पाटील यांनी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या आराखड्याचे बैठकीच्या प्रारंभी सादरीकरण केले. दत्त चौकात शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक अशा पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने उपस्थितांनी विविध सूचना मांडल्या.

बुधवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुतळ्याच्या संपूर्ण चौकाचे व चबुतरा याचे नव्याने सुशोभीकरण करण्यात येणार आहे. परिसरात सिमेंटचे भाग (पेव्हर ब्लॉक) बसवण्यात येणार आहेत. या सर्व आराखड्याचे सचित्र सादरीकरण झाले. त्यावर नागरिकांनी सुशोभीकरणाबाबत सूचना केल्या. या सूचनांचा विचार सुशोभीकरणात करण्यात येणार असल्याचे राजेंद्र यादव यांनी सांगितले. ही कामे दर्जेदार केली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महात्मा जोतिबा फुले पुतळ्याचे चबुतरा सुशोभीकरण तसेच परिसरातील एका जागेवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व त्यात त्यांचा अर्धपुतळा बसवण्यात येणार आहे. मुजावर कॉलनी येथे संविधान स्तंभ उभारण्यात येणार असून, स्तंभावर अशोकचक्राची प्रतिकृती असणार आहे.