हिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ३१ मे रोजी श्रीक्षेत्र चौंडी येथे उपस्थित राहण्याचे निमंत्रण विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज, बुधवारी दिल्लीत दिले. यापूर्वी सन १९९६ मध्ये राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा चौंडी येथे अहिल्यादेवी यांच्या २०१ व्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.

सभापती राम शिंदे यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ३१ मे रोजी चौंडीला येण्याचे निमंत्रण दिले. या निमित्ताने राष्ट्रपती चौंडीला येणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरणार आहेत. ३०० व्या जयंतीनिमित्त महिला राष्ट्रपती चौंडीला येत असल्याने चौंडीचे महत्त्व अधिक वाढणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वी, ६ मे रोजी चौंडीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीच्या निमित्ताने चौंडीच्या ७०० कोटी रुपयांच्या बृहत् विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर चौंडी येथे सीना नदीपात्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा १०८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा व समूह शिल्प उभारण्यात येणार आहे. याबरोबरच संग्रहालय, भक्तनिवास, अंतर्गत रस्ते सीना नदीवर बंधारे, चौंडीला जोडणारे रस्ते अशी कामे मार्गी लागणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दि. ३१ मे रोजी जयंतीदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात विविध विकासकामांची घोषणा होण्याची शक्यता आहे.