राष्ट्रीय भावना आणि अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचे साहस महाराष्ट्राच्या नसानसांत भिनलेले आहे. १९ व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि महादेव गोविंद रानडे यांनी ज्या समाजसुधारणेला सुरुवात केली. त्याला बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महाराष्ट्रातील सेवाग्राम आश्रमातूनच केले, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किल्ले रायगडावर काढले.

राष्ट्रपती कोविंद यांनी सोमवारी सपत्निक किल्ले रायगडाला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.  

छत्रपती शिवाजी महाराजांनी जनसामान्यांत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. त्यांच्या युद्धकौशल्यासमोर मुघलांची विशाल सेनाही अपुरी पडली. या परिसराचा गौरव शिवाजी महाराजांनी वाढवला. शौर्याच्या जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि विस्तारही केला. भारताच्या पहिल्या नौदलाची पायाभरणी त्यांच्याच कार्यकाळात झाली.

छत्रपतींचा समाज सुधारणेचा हा वारसा नंतरच्या काळात समाजसुधारकांनी पुढे नेला, त्यामुळे रायगडाला भेट देणे हे माझ्यासाठी तीर्थयात्रेप्रमाणे आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. राष्ट्रपती भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरने पाचाड येथे दाखल झाले. त्यांनतर त्यांनी किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचा आढावा घेतला. राजसदरेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी त्यांना भवानी तलवार, दांडपट्टा, आज्ञापत्र आणि शिवकालीन होन यांची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. यानंतर राष्ट्रपतींनी होळीच्या माळावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.