गंभीर गुन्हय़ात चुकीने किंवा जाणीवपूर्वक एखाद्याचे नाव गोवले गेले तर व्यक्तीची आणि कुटुंबाची ससेहोलपट होते याची जाणीव असल्यानेच मी केवळ वकिलीची परीक्षा देऊन थांबणार नाही, तर प्रसंगी न्यायाधीश बनण्याची माझी इच्छा आहे. माझ्या वकिलीच्या ज्ञानाचा उपयोगही मी अशाच माणसांसाठी करणार आहे.
सुखदेव हणमंत पांढरे हा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी सांगत होता. सांगली जिल्हय़ातील शिंगणापूरगावचा सुखदेवला १९९८ साली एका खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. पण त्याने शिक्षा भोगत असतानाही शिक्षणाचा ध्यास घेतला आणि एलएल.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण क्षेत्रातील ही भरारी सुखदेव घेऊ शकला तो कोल्हापुरातील दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. डॉ. रूपा शहा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच कारागृहातील अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे. सध्या पैठणच्या मुक्त कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सुखदेव नुकताच आपल्याला ज्यांनी शिक्षणासाठी सहकार्य केले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता कोल्हापुरात आला होता.
दिलासाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. शहा यांना तत्पूर्वी एक पत्र पाठवून सुखदेवने एलएल.एम.च्या परीक्षा फीची सोय करण्याबाबत विनंती केली. प्रा. डॉ. शहा या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्याही मानद सदस्य असल्याने त्यांनी सुखदेवबाबतची माहिती क्लबच्या सदस्यांना दिली आणि दिलासा व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या सदस्यांच्या सहयोगातून १० हजार रुपयांची रक्कम जमा झाली. सोमवारी सुखदेव कोल्हापुरात आल्यानंतर एलएल.एम.परीक्षेच्या शुल्कासाठी म्हणून रोटरी क्लब कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, रवि संघवी, राजू परीख, श्रीकांत झेंडे आदींच्या उपस्थितीत जमा झालेली रक्कम धनादेशाच्या स्वरूपात सुखदेवला देण्यात आली.
सुखदेवला जन्मठेप झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याला कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. याच दरम्यान राष्ट्रीय छात्रसेनेच्या महावीर महाविद्यालयातील युनिटमधील छात्रसैनिक विद्याथिनींना सोबत घेऊन सहयोगी एनसीसी अधिकारी मेजर प्रा. डॉ. शहा यांनी कळंबा कारागृहात कैद्यांसमवेत रक्षाबंधनासारखा उपक्रम पहिल्यांदा राबविला.
या उपक्रमाने कारागृहातील कैदी खूप भारावले होते. प्रा. डॉ. शहा यांनी त्या वेळी मांडलेल्या विचारांचा प्रभावही कैद्यांवर पडला आणि त्यापैकी एक कैदी होता तो सुखदेव. कारागृहातील या कार्यक्रमानंतर कैद्यांनी पाठवलेली अनेक पत्रे शहा यांना मिळाली होती. त्यापैकी सुखदेवचे पत्र लक्ष वेधून घेणारे होते. कारण त्याने आपल्याला शिकून पदवीधर होण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या वर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रा. डॉ. शहा यांनी पत्रकार उदय कुलकर्णी यांच्यासमवेत कारागृहात जाऊन सुखदेवच्या अडचणी समजून घेतल्या. मुख्य अडचण अशी होती, की जन्मठेपेसारखी शिक्षा झालेल्या कैद्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पदवी अभ्यासक्रम जिथे चालतात अशा ठिकाणी वर्गाना उपस्थित राहता येणे शक्य नव्हते. कारागृहातील शिक्षणाची आस असणाऱ्या अशा कैद्यांसाठी मुक्त विद्यापीठातर्फे कारागृहातच मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याची गरज होती. शैक्षणिक शुल्काबाबतची अडचणही होतीच. प्रा. डॉ. शहा यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे यांच्यासमोर या अडचणींबाबतची मांडणी करून पाठपुरावा केल्यानंतर डॉ. साबळे यांनी पदवी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या कैद्यांसाठी मुक्त विद्यापीठातर्फे कळंबा कारागृहात मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आणि सुखदेव पांढरेसारख्या आर्थिक अडचण असणाऱ्या कैद्याचे शैक्षणिक शुल्कही माफ करून टाकले. यातून इंग्रजीसारखा विषय घेऊन सुखदेव ६० टक्के गुण मिळवत बी.ए. झाला. पुढे त्याने मानवी हक्क अधिकारांचा तीन महिन्यांचा अभ्यासही पूर्ण केला.
 दरम्यान, सुखदेवची रवानगी चांगल्या वर्तणुकीमुळे पैठण येथील खुल्या कारागृहात झाली होती. तेथून त्याने २००९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. जन्मठेपेचा कैदी असल्याने परीक्षा द्यायला जाताना त्याला बंदूकधारी पोलिसांच्या बंदोबस्तात आणि हातात बेडय़ा अशा अवस्थेत परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. पण मनोधैर्य खचू न देता आणि एकदाही अनुत्तीर्ण न होता सुखदेव या वर्षी ५८ टक्के गुणांसह एलएल.बी.ची परीक्षा उत्तीर्ण झाला. आता तो इंडियन बार कौन्सिलचा अधिकृत पदवीधर आहे आणि एलएल.एम.च्या सत्र परीक्षा देतो आहे.
सुखदेव म्हणतो, मी जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. पण त्यापैकी खूपसा काळ मी शिक्षणात व्यतीत केल्याने मला त्याची खंत नाही. पण मी वकील झाल्याचे वडील पाहू शकले नाहीत, याचे दु:ख आहे. आता जून २०१३ मध्ये माझी जन्मठेपेची शिक्षा संपणार आहे. माझ्या चांगल्या वर्तणुकीची दखल घेऊन राज्याचे गृहमंत्री व गृहराज्यमंत्री यांनी मला उर्वरित कालावधीसाठी शिक्षेतून सूट दिली तर मी समाजातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहीन.