विजय पाटील

कृष्णेच्या काठावर लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी धोबीपछाड दिली होती. राज्याने ते बघितले होते. आता मात्र पृथ्वीराजबाबा आणि विलासकाका यांच्यात आज, शुक्रवारी दिलजमाई होत असली तरी दोन्ही गटांना ती पचनी पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसच्या कराडमधील राजकारणाला कायम गटबाजीची किनार राहिली आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि पृथ्वीराजबाबांचे वडील आनंदराव चव्हाण व आई प्रेमलाकाकी चव्हाण यांचे कधीच जमले नाही. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यात आणि विलासकाकांमध्ये गटबाजी निर्माण झाली. पृथ्वीराजबाबा हे महाराष्ट्रात परतल्यावर विधानसभेवर निवडून जाण्याकरिता त्यांचा डोळा दक्षिण कराड मतदारसंघावर होता. विधान परिषदेचे तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांनी पृथ्वीराजबाबा आणि विलासकाकांमध्ये समझोता घडवून आणण्याकरिता बरेच प्रयत्न केले; पण विलासकाकांनी आमदारकी सोडण्यास नकार दिला. त्यातून पृथ्वीराजबाबा आणि विलासकाकांमध्ये बिनसले आणि परस्परांचे राजकारण संपविण्यापर्यंत उभय बाजूंची मजल गेली.

पृथ्वीराज चव्हाणांचा राजकीय श्रीगणेशा उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व अन् पक्षनिष्ठेच्या मुद्दय़ावर सहज शक्य झाला; परंतु कराड मतदारसंघातून लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर होताच अनेकांना भविष्यातील त्यांचा अडसर दिसून आल्याने १९९१च्या या निवडणुकीत राजीव गांधींच्या निधनानंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत चव्हाणांचा जिकिरीने विजय झाला. या वेळी त्यांच्याच पक्षातील अनेकांची दगाबाजी चर्चेत आली. पुढे हे तिढय़ाचे राजकारण काँग्रेसच्या उभ्या फुटीपर्यंत ताणले गेले. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री आणि पक्षाच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्तरावरील पदावर राहिले. अशातच १० नोव्हेंबर २०१० रोजी पृथ्वीराजांची प्रतिकूल राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्रिपदावर काँग्रेस श्रेष्ठींनी निवड केल्याने महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

महाराष्ट्रावर ‘पृथ्वी’राज आल्याने तिढय़ातील कारभाऱ्यांचे धाबे दणाणले. कधी नव्हे ते राज्यातील दलालराज, बांधकाम लॉबीही हादरली. हे सारे होत असताना, घरच्या मैदानावर मात्र, पृथ्वीराजांना स्वकीयांच्या नाराजीचा सामना कायम करावा लागला. मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर २५ नोव्हेंबर २०१० रोजी देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरणदिनी पृथ्वीराजांचे कराडमध्ये सर्वप्रथम दिमाखात आगमन झाले. कराडनगरी आनंदली. पृथ्वीराजबाबांचे विमानतळावर आगमन होताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिणचे तत्कालीन आमदार विलासकाका उंडाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र, चव्हाणांनी उंडाळकरांना हाताला धरून आपल्या मोटारीत न घेता मुख्यमंत्र्यांसह नेत्यांचा ताफा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाकडे पोहोचला. इथेच ज्येष्ठत्वाचा अवमान झाल्याची सल उंडाळकरांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या काळजात रुतली असावी. खरे तर त्या वेळेस उंडाळकरांच्या हातात चव्हाणांचा हात गुंफला असता तर या दोन नेत्यांमधील हाडवैराचे दुष्परिणाम अवघ्या महाराष्ट्रातील काँग्रेसला भोगावे लागले नसते. हे कटू सत्य आहे. यानंतर सत्तेच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडीचे थेट राजकारण होताना, अस्तित्वावरही घाले घातले गेले. टीकास्त्रे आणि आरोपांच्या फैरीत आघाडी घेण्याची लढाईच दिसून आली. या वादातूनच विलासकाकांच्या मुलाला तुरुंगाची हवा खावी लागल्याची चर्चा होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उंडाळकरांची कराड दक्षिणमधील उमेदवारी कापून या जागेवर काँग्रेसचे नेतृत्व अर्थात पृथ्वीराज चव्हाण लढले आणि साजेशा मताधिक्याने जिंकलेही; परंतु त्यांना सामना करावा लागला तो काँग्रेसच्याच बंडखोर विलासकाका उंडाळकरांचा. या लढतीत डॉ. अतुल भोसले हे भाजपच्या उमेदवारीवर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पृथ्वीराजबाबा दक्षिण कराडमधून विजयी झाले असले तरी राज्यातील काँग्रेसचा जनाधार पार घसरला होता आणि राज्यातील सत्ताही गमवावी लागली होती.

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राच्या सत्तेत आले आणि टप्प्याटप्प्याने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्य़ातील काँग्रेसनिष्ठ मंडळी भाजप, शिवसेनेसारख्या अगदी विरूद्ध विचाराच्या पक्षात सामावल्याने पृथ्वीराजांचे राजकारण स्थानिक नेत्यांना रुचले नसल्याचे सिद्ध झाले. अगदी चव्हाणांचे व्यवस्थापन प्रमुख आणि दीर्घकाळ सातारा जिल्ह्य़ाच्या काँग्रेस नेतृत्वाची धुरा सांभाळणारे आणि त्यांनीच केलेले विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील यांनीही फारकत घेतल्याने साताऱ्यातील काँग्रेसफुटीचा शेवटचा धागाही उसवला गेला.

गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २०१४च्या निवडणुकीप्रमाणेच लढत झाली; परंतु विलासकाकांच्या जागेवर त्यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांनी बंडखोरी केली. त्या वेळी डॉ. अतुल भोसलेंच्या कमळ चिन्हाचा भाव काहीसा वधारला. मात्र, भोसलेंच्या नशिबी सार्वत्रिक निवडणुकीतील अपयश कायम राहिले. पृथ्वीराजांचे मताधिक्य घटले; पण जिंकले ते चव्हाणच. या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे एकमेकांनी केलेले आरोप खळबळ माजवणारे होते.

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या रोहिणी शिंदे यांचा थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय होताना, दुसरीकडे मात्र, पृथ्वीराजांचे १६ शिलेदार नगरसेवक झाले. पालिका सभागृहात काँग्रेस विचाराचे बहुमत असल्याचे चित्र उभे राहतानाच १५ नगरसेवकांनी पृथ्वीराजांकडे पाठ करून हादरा दिला. काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. भाजपचा बोलबाला वाढला. पुढे मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत उंडाळकरांच्या पुत्रांमुळे काँग्रेसचे पॅनेल काठावर जिंकले. काँग्रेसच्या नगराध्यक्षा नीलिमा येडगे या तर केवळ पावणेतीनशे मतांनी जिंकल्या. येथूनच चव्हाण-उंडाळकरांनी एकत्र येऊन भाजपच्या भोसलेंना अटकाव करावा, असा सूर काँग्रेसजनांमधून व्यक्त होत गेला आणि हीच संधी साधून काँग्रेसचे युवा नेते, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि मलकापूरचे उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मध्यस्थाची भूमिका यशस्वी करून पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकरांमध्ये दिलजमाई घडवून आणली.

भले कोणाचे?

पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील-उंडाळकर यांचा मनोमीलनाचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, त्यातून काँग्रेसजनांचे आणि जनतेचे काय भले होईल, विलासकाकांचे पुत्र उदयसिंहांच्या गळ्यात सत्तेची कोणती माळ पडेल, हे येणारा काळच ठरवेल; पण जनाधार दाखवण्यासाठी अगदी टोकाच्या झालेल्या राजकारणानंतर कृष्णाकाठचे आणखी एक हे मनोमीलन किमान या दोन नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या खरोखरच पचनी पडले असेल का, याबाबत राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा रंगत आहेत.