कराड : कराड विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक निधी, परवानग्या आणि प्रशासकीय मान्यतांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळापासून सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे काँग्रेसचे नेते नामदेव पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये श्रेयवादावरुन जुंपण्याची चिन्हे आहेत.
याबाबतच्या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे, की माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेले कराड विमानतळ भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विस्तारीकरणाच्या दिशेने नेण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले. २८ ऑगस्ट २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ९५ कोटी ६४ लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०२३ रोजी २२१ कोटी ५१ लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर झाला. यात भैरवनाथ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी स्थलांतरासाठी १७ कोटी १६ लाख रुपयांचा निधीही समाविष्ट आहे.
या संदर्भात विमानतळबाधितांचे पुनर्वसन, भूसंपादन आणि पाणीपुरवठा योजनेचे स्थलांतर याबाबत २० जुलै २०२४ रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. कराडच्या सर्वांगीण विकासासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरदृष्टीने नियोजन केले असून, कराड विमानतळ विस्तार हा त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. या कामाबाबत श्रेयवाद न करता कराड दक्षिणची राजकीय परंपरा जपावी, असे आवाहन नामदेव पाटील यांनी पत्रकात केले आहे.
दरम्यान, कराड विमानतळ विस्तारीकरण कामास स्थानिकांचा कडवट विरोध असून, आता कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समिती काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा वगैरे घेतात किंवा आंदोलनाची दिशा जाहीर करतात याकडे प्रकल्पग्रस्तांसह प्रशासनाच्या नजरा लागून आहेत.