सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीनजीक आढेगावच्या हद्दीत खासगी आराम बस उलटी झाल्याने घडलेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. यात तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. साई गणेश ट्रॅव्हल्स कंपनीची एमएच ४८ के १९८१ ही प्रवासी आराम बस पहाटे अहमदपूर (जि. लातूर) येथून पुण्याकडे निघाली होती. पहाटे चारच्या सुमारास ही बस सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीच्या अलीकडे आढेगाव (ता. माढा) हद्दीत आली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटी झाली.

बसमध्ये ४० प्रवासी होते. त्यातील २० प्रवासी जखमी झाले. यापैकी तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना सोलापुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात घडताच महामार्गावरील रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांची कुमक अपघातस्थळी धावून आली. पोलीस मित्रांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना टेंभुर्णी येथील अकबर खान यांच्या रुग्णवाहिकेसह आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून आणि वरवडे येथील पथकर नाक्यावरील रुग्णवाहिकेतून टेंभुर्णी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तीन प्रवाशांना सोलापुरातील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अपघात घडताच बसचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.