मुंबई : टाळेबंदीच्या काळात उद्योग-व्यवसायाला काही भागात परवानगी देण्याच्या धोरणाला आता चांगला प्रतिसाद मिळत असून ३० एप्रिलअखेर राज्यात एकू ण १३ हजार ५६० उद्योगांमध्ये उत्पादन सुरू होऊन एक लाख ३९ हजार कामगार कामावर रूजू झाल्याने अर्थचक्र पुन्हा गती घेत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात विश्वासाचे वातावरण तयार होत असून पुढील काही दिवसांत ही संख्या वाढण्याची उद्योग विभागाची अपेक्षा आहे.
देशात टाळेबंदीच्या काळात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याच्या धोरणानुसार २० एप्रिलपासून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या उद्योग विभागाने आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारखाने सुरू करण्यासाठीच्या परवानग्यांची प्रणाली सुरू के ली. पहिले दोन-तीन दिवस काही तांत्रिक अडचणी, स्थानिक प्रशासनाच्या परवानग्या मिळण्यात अडचण असे अडथळे आले. पण नंतर हळूहळू परिस्थिती सुधारत आहे.




राज्यात २० एप्रिलनंतर २० हजार ५५८ कारखान्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यात चार लाख ६८ हजार कामगारांची आवश्यकता आहे. एप्रिल महिना संपत असताना ८०५ मोठे तर १२ हजार ७५५ लघु व मध्यम असे एकू ण १३ हजार ५६० उद्योग सुरू झाले असून त्यापैकी ६७३९ उद्योग हे २० एप्रिलनंतर सुरू झाले आहेत. त्यात आता एकू ण एक लाख ३९ हजार ४७२ कामगार रूजू झाले आहेत. परवानगी मिळाल्यानंतर साधनसामुग्री व कामगारांची जुळवाजुळव यात उद्योगांना थोडा वेळ लागत असून परवानगी मिळालेले आणखी अनेक उद्योग पुढील काही दिवसांत सुरू होतील.
राज्यात औरंगाबादमध्ये सर्वाधिक ४१ हजार कामगार आपापल्या कारखान्यांत रूजू झाले आहेत. तर नाशिकमध्ये २७ हजारांपेक्षा अधिक कामगार रूजू झाले आहेत. त्याचबरोबर पालघर, रायगड आदी ठिकाणीही लक्षणीय प्रमाणात उद्योग सुरू होत आहेत.
राज्यात सुरू झालेल्या उद्योगांपैकी ६० टक्के उद्योग हे एमआयडीसी क्षेत्रातील आहेत ही समाधानाची बाब आहे. नाशिक, रायगड, औरंगाबाद या ठिकाणी खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील काही दिवसांत यापूर्वीच परवानगी दिलेले आणखी उद्योग सुरू होतील व अधिक संख्येने कामगार कामावर परत रूजू होतील, असा विश्वास आहे.
– डॉ. पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी.