माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील यांत्रिक कत्तलखान्याविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात २० ते २५ हजार लोक सहभागी होण्याची शक्यता असून, या पाश्र्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे ७० एकर परिसरात आशिया खंडातील सर्वात मोठा कत्तलखाना उभारला जातो आहे. कत्तलखान्याचे बांधकाम पूर्ण होत आले असून, यंत्रसामग्री दाखल करण्यात आली आहे. मात्र या कत्तलखान्याला जिल्हाभरातून तीव्र विरोध केला जातो आहे. कत्तलखाना रद्द करून कंपनीने केलेले अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्याची मागणी केली जाते आहे. याच मागणीसाठी आज रायगड बंदची हाक देण्यात आली असून, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असल्याने यात २० ते २५ हजार लोक सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
दरम्यान मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर अलिबागमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तात चार पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक, पाच महिला पोलीस उपनिरीक्षक आणि ४२२ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. याशिवाय दंगलविरोधी पथकाच्या दोन प्लाटून्स आणि शीघ्र कृती दलाची एक तुकडी बंदोबस्तासाठी असणार आहे.
मोर्चा सुरू असताना कच्छी भवन ते कलेक्टर ऑफिसदरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार असून, वाहतुकीसाठी जाणारा मार्ग बंद ठेवला जाणार आहे. मात्र ही वाहतूक पर्यायी मार्गाने सुरळीत ठेवली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप बागाडे यांनी सांगितले. मोर्चासाठी येणारी वाहने रिलायन्स पेट्रोलपंप, बायपास रोड आणि डीकेईटी शाळा परिसरात पार्क करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर सर्व शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार असून, रायगड बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार असल्याचे मोर्बा कत्तलखानाविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष विजयराज खुळे यांनी सांगितले.
दरम्यान, आमचा मोर्चा कुठल्याही एका धर्माविरोधात अथवा जिल्हा प्रशासनाविरोधात नसून कत्तलखान्याविरोधात आहे. जातीय तेढ निर्माण करणे हा आमचा उद्देश नसून आमच्या भावना शासनापर्यंत पोहचाव्या एवढी माफक अपेक्षा आहे. कत्तलखान्याला स्थगिती नको तो पूर्ण हटवावा अशी आमची मागणी आहे. मोर्चा शांततेत होईल, असेही विजयराज खुळे यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2014 रोजी प्रकाशित
मोर्बा कत्तलखान्याविरोधात आज मोर्चा
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील यांत्रिक कत्तलखान्याविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे.
First published on: 20-01-2014 at 01:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against morba slaughter house on collector office